आपण एक आहोत आणि आपल्याला एकत्रच राहायच आहे!; मुख्यमंत्र्यांकडून युती होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 19:56 IST2019-02-04T18:48:37+5:302019-02-04T19:56:12+5:30
महा पशुधन एक्स्पोचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित समारोप झाला. यावेळी बोलताना त्यांनी युती होणार असल्याचे संकेत दिले.

आपण एक आहोत आणि आपल्याला एकत्रच राहायच आहे!; मुख्यमंत्र्यांकडून युती होण्याचे संकेत
जालना : भावंडामध्ये वाद होत असतात. पण, घरातील वाद आपणच संपवायला हवेत. वयाने लहान असलो, तरी मोठा भाऊ म्हणून मी हा वाद मिटविणार आहे. कारण आपण एक आहोत आणि आपल्याला एकत्रच राहायचं आहे, अशी मनधरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पशुधसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांची केली. जालन्यात आयोजित केलेल्या महा पशुधन एक्स्पोचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित समारोप झाला. यावेळी बोलताना त्यांनी युती होणार असल्याचे संकेत दिले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे जालन्याचे आमदार तथा पशुसंवर्धन मंत्री अर्जून खोतकर यांच्यातील राजकीय वैर गेल्या काही दिवसांत शिगेला पोहोचले आहे. शिवसेना भाजप युती होणार असल्याची चर्चा होत असताना अर्जून खोतकर वारंवार दानवे यांना आव्हान देण्याची भाषा करीत आहे. त्यामुळे खोतकरांनी घेतलेल्या अनेक कार्यक्रमांकडे खा. दानवे यांनी पाठ फिरवली. मात्र, रविवारी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित दोघेही एका व्यासपीठावर दिसल्याने तह होण्याची सुरूवात झाली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याने दुजोराच मिळाला आहे.
महा पशुधन एक्स्पोच्या उद्घाटनाला येऊ न शकलेले मुख्यमंत्री फडणवीस आज समारोपाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दानवे आणि खोतकर यांच्यातील तणाव निवळण्यासाठी खोतकरांना मैत्रीची साद घातली. तसेच राज्यातील युती होणार असल्याचे संकेत देत एका दगडात दोन पक्षी टिपले. खोतकरांचा नामोल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, घरांमध्ये वाद होतात. भावंडामध्ये वाद होतात. पण, हे वाद घरातच मिटायला हवेत. आपण पूर्वीपासून एकत्र आहोत. आपल्याला आताही एकत्रच राहायच आहे. दोन भावंडांमधील वाद मिटविण्यासाठी मी भाऊ म्हणून प्रयत्न करेल, असे सांगत फडणवीसांनी युती होण्याबद्दल अप्रत्यक्ष विश्वास व्यक्त केला.