Water supply in the dam | धरणातील चरच ठरतेय पाण्याचा आधार
धरणातील चरच ठरतेय पाण्याचा आधार

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता वाढली : पद्मावती धरणाची पाणी पातळी खालावल्याने खोदली चर

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरण हे नेहमी दुष्काळाच्या काळात उत्तर भोकरदन मधील गावातील नागरिकांना उपयुक्त ठरत असते. मात्र, आता दुष्काळाची दाहकता वाढली असल्याने तसेच या धरणावर पाण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून टँकरचा ओढा असल्याने या धरणातील पाणी पातळी आता जोत्याखाली आली असल्याने या धरणात आता परिसरातील ग्रामपचांयतीने चर खोंदुन पाण्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
दरम्यान प्रशासकीय बैठकीत चर खोदुन पाण्याची व्यवस्था करावी अशा देखील सुचना यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तालुका प्रशासन देखील आता पाण्याच्या शोधात भर उन्हात धावपळ करु लागले आहे. तालुक्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने परिसरातील नदी, नाले, तलाव, लघु, मध्यम प्रकल्प यांनी हिवाळ््याच्या प्रारंभीच तळ गाठला होता. त्यामुळे तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली असून ८९ गावांमध्ये १०५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.
तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी उपयुक्त ठरणारे दानापूर येथील जुई धरण तसेच शेलुद येथील धामणा धरण हे कधीचेच आटले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याची भिस्त ही बाणेगाव व पद्मावती धरणावर येऊन ठेपली आहे. मात्र, त्यात देखील आता झपाट्याने पाणी उपसा सुरु असल्याने हे दोन्ही धरणातील पाणी पातळी देखील धोक्यात आली आहे.
येणाऱ्या काळात नागरिकांना पाण्यासाठी अडचण भासू नये म्हणून तालुका प्रशासन देखील भर उन्हात टंचाईग्रस्त भागात भेट देऊन पाणी टंचाईचा आढावा घेऊन त्या दिशेने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
सध्या पद्मावती, जुई धरण व बाणेगाव येथील धरणात प्रशासनाने मोठाले सहा चर खोदण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या व्यतिरिक्त अठरा ग्रामपचांयतीने लोकसहभाग व चौदाव्यावित्त आयोगातुन चर खोदुन आपली पाण्याची व्यवस्था करुन घेतली आहे. मात्र, चराचे पाणी हे दिर्घ कालीन टिकणारे नसल्याने आणखी काही दिवसात अडचणी निर्माण होऊ शकत असल्याचे ग्रामपचांयतीने सांगितले आहे.


Web Title: Water supply in the dam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.