जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातील पाणी जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:52 IST2019-08-13T00:51:57+5:302019-08-13T00:52:45+5:30
जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला असून, प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातील पाणी जिल्ह्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला असून, प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी अंबड तालुक्यातील वडीगोद्रीसह इतर गावांमधील कॅनॉलमध्ये सोमवारी दाखल झाले. कॅनॉलला पाणी आल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून, दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जालना जिल्ह्यात यंदा अपेक्षित असा मोठा पाऊस झालेला नाही. अंबड व घनसावंगी तालुक्यातही परिस्थिती तशीच आहे. पावसाअभावी काही ठिकाणी खरिपाची दुबार पेरणी झाली. गत काही दिवसांमध्ये पडलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. परंतु फळबाग व ऊस पिकासाठी अधिक पावसाची गरज आहे. गोदाकाठच्या गावात आजही जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीव्र असून, गावा-गावातील पाणीटंचाईही कायम आहे. जायकवाडी जलाशयातून शेतीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक व अहमदनगर परिसरात मोठया प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे मराठवाडयासाठी जीवनदायिनी असलेला जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी दाखल झाल्याने शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या गावच्या शिवारात पाणी
अंबड तालुक्यातील भांबेरी, दह्याला, नालेगाव, अंतरवाली, सराटी, वडीगोद्री, आपेगाव, बळेगाव, साष्ट पिंपळगाव, चुर्मापुरी, महाकाळा, पाथरवाला खुर्द, बुद्रूक, घुंगर्डे हादगाव, करंजला, पिठोरी शिरसगाव, एकलहेरा, तीर्थपुरी, भारडी आदी गावांना डाव्या कालवा व त्याच्या वितरिकांमार्फत पाणीपुरवठा केला जातो.
या गावांच्या शिवारातील लाखो हेक्टरवरील पिकांना या पाण्याचा लाभ होणार आहे. शिवाय जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे.
मोठ्या पावसाची प्रतीक्षा
दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट कायम असून, इतर जलस्त्रोतांची अवस्थाही बिकट आहे. पाणीप्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम
आहे.