Valentine Day ; गावे पाणीदार करण्यासाठी झटणारे दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:54 PM2019-02-14T13:54:44+5:302019-02-14T13:57:11+5:30

गावाला एकत्रित करून गावाचा चेहरामोहरा बदलणारे दाम्पत्य म्हणून जालन्यातील रघुनंदन लाहोटी आणि त्यांची पत्नी कविता लाहोटींची ओळख निर्माण झाली आहे.

Valentine Day; The couple struggling to full of water in villages | Valentine Day ; गावे पाणीदार करण्यासाठी झटणारे दाम्पत्य

Valentine Day ; गावे पाणीदार करण्यासाठी झटणारे दाम्पत्य

Next

- संजय देशमुख 

जालना : स्वत:चा मोठा उद्योग, व्यवसाय असताना ग्रामीण भागात जाऊन त्यांच्याशी सर्वार्थाने एकरूप होऊन तेथील केवळ पाणी समस्याच नव्हे तर त्या गावातील शिक्षण, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती तसेच धार्मिक कार्यक्रमांतून आपल्या परंपरा रुजवून त्यातून गावाला एकत्रित करून गावाचा चेहरामोहरा बदलणारे दाम्पत्य म्हणून जालन्यातील रघुनंदन लाहोटी आणि त्यांची पत्नी कविता लाहोटींची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून लाहोटी दांपत्याने हा वसा जपला आहे.

आतापर्यंत जवळपास १५ पेक्षा अधिक गावांत जलसंधारणाचे काम केले असून, याचा श्रीगणेशा त्यांनी जालन्यापासून जवळच असलेल्या रोहनवाडी येथून केला. आज रोहनवाडी या गावाची तहान भागवण्यासह सिंचनाचा प्रश्न जवळपास निकाली निघाला आहे. धुळे जिल्ह्यातील देशी  गीरगार्इंचे संगोपन करून तेथील शेतीला पूरक व्यवसाय उभारला आहे. एवढेच नव्हे तर अद्ययावत दूध डेअरी उभारून शेतमजूराला मालक बनवण्याची किमया त्यांनी रोहनवाडीत साधली आहे.

अहंकार देऊळगाव, सारवाडीसह अन्य गावांमध्ये जाऊन या पती-पत्नीने लोकांना पर्यावरणाचे महत्त्व तसेच जलसंधारण ही काळाची गरज किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले आहे. केवळ भाषणबाजी न करता गावाचा शास्त्रोक्त पध्दतीने अभ्यास करून ते जलसंधारणाची कामे करतात. रसायनमुक्त शेती करण्यासाठी त्यांनी चार वर्षापूर्वी सेंद्रीय शेतीसह झिरो बजेटचे प्रणेते सुभाष पाळेकर यांचे आठ दिवसांचे विशेष शिबीर रोहनवाडीत घेतले होते. या शिबिरानंतर संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती तसेच झिरो बजेट शेतीचे महत्त्व पटले. यामुळे विषमुक्त पिकांच्या उत्पादनाला चालना मिळाली आहे. 

रोहनवाडीचा कायापालट
रोहनवाडी येथे उत्पादित दूध तसेच सेंद्रिय भाजीपाला विक्री करताना ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून, यातून जो काही नफा उरतो, तो पूर्णपणे त्या शेतकऱ्यांना मिळतो.त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न मिळाले आहे.  सामूहिक गायत्री यज्ञाच्या माध्यमातून सर्वांना एका धाग्यात बांधून आपल्या गावाच्या विकासाठीच्या संदर्भातील शपथ घेण्यात येते. असे विविध सामाजिक उपक्रम हे दाम्पत्य राबविते.

Web Title: Valentine Day; The couple struggling to full of water in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.