दुर्दैवी! सुटी घेऊन मुळगावी निघालेल्या जवानाचा रेल्वेतून पडल्याने जालन्यात मृत्यू
By विजय मुंडे | Updated: March 13, 2023 18:40 IST2023-03-13T18:38:03+5:302023-03-13T18:40:09+5:30
सध्या ते अहमदनगर येथे कार्यरत होते.

दुर्दैवी! सुटी घेऊन मुळगावी निघालेल्या जवानाचा रेल्वेतून पडल्याने जालन्यात मृत्यू
जालना : रेल्वेतून पडल्याने एका जवानाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास जालना ते सारवाडी रेल्वे मार्गादरम्यान घडली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल मारुती ढगे (वय ३० रा. पळसी, जि. हिंगोली) असे मयत जवानाचे नाव आहे. राहुल ढगे हे दहा वर्षापूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी जम्मू-काश्मिर भागात सेवा बाजावली आहे. सध्या ते अहमदनगर येथे कार्यरत होते. राहुल ढगे हे रविवारी रात्री रेल्वेने गावाकडे निघाले होते. जालना-सारवाडी रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक १८२/०८ जवळ सोमवारी पहाटेच्या सुमारास धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने राहुल ढगे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस, तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. या प्रकरणात ट्रॅकमेन अशोककुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ. राम शिंदे हे करीत आहेत. मयत जवानाच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.