'पासपोर्ट लागत नाही' समजलं, बदनापूरच्या अल्पवयीन मैत्रिणींनी फिरण्यासाठी थेट नेपाळ गाठलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:49 IST2025-12-10T13:02:33+5:302025-12-10T13:49:02+5:30
शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडल्या, नेपाळ फिरून मुंबईत आल्या; बदनापूरमध्ये दोघींचे पालक ९ दिवस तणावात

'पासपोर्ट लागत नाही' समजलं, बदनापूरच्या अल्पवयीन मैत्रिणींनी फिरण्यासाठी थेट नेपाळ गाठलं!
बदनापूर (जि. जालना) : पासपोर्ट लागत नसल्याने नेपाळला फिरण्यासाठी गेलेल्या आणि तेथून काळवा (ठाणे) येथे परत आलेल्या दोन अल्पवयीन मुलींना बदनापूर पोलिसांनी मंगळवारी ९ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. नऊ दिवसानंतर मुली कुशीत आल्याने पालकांना अश्रू अनावर झाले होते.
बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुली (एक १४ वर्षे आणि दुसरी १५ वर्षे) १ डिसेंबर रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. परंतु, त्या घरी न आल्याने पालकांनी बदनापूर पोलिसात धाव घेतली. पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल केला. तपासासाठी तीन पथके तयार केली. एक टीम बिहार, उत्तर प्रदेश आणि नेपाळ भागात पाठविण्यात आली. दुसरी टीम मुंबई आणि तिसरी टीम स्थानिक पातळीवर शोध घेत होती. तांत्रिक विश्लेषणानंतर त्या मुली नेपाळमध्ये असल्याचे समजले. पोलिसांची एक टीम पाठवून शोध घेणे सुरू केले असता त्या मुली मुंबईकडे गेल्याचे समजले. नंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करीत कळवा ठाणे येथे त्या दोन मुलींना ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रियेनंतर मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
पासपोर्ट लागत नसल्याने निवडले नेपाळ
लहान मुलींना विचारपूस केली असता आम्ही फिरायला बाहेरच्या देशात गेलो होतो. पासपोर्ट लागत नसल्याने नेपाळ येथे गेलो. त्यानंतर मुंबई येथे खोली करून राहणार होतो, असे मुलींनी पोलिसांच्या तपासात सांगितले.
...यांनी केली कामगिरी
या दोन्ही मुलींचा शोध लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम. टी सुरवसे, महिला सपोनि. स्नेहा करेवाड, पोउपनि. अजय जैस्वाल, पोकाॅ. गोपाळ बरवाल, पोकाॅ. परमेश्वर ढगे, पोकाॅ. अनिल पिल्लेवाड, पोहेकॉ. सागर बाविस्कर, पोकाॅ. संदीप मांटे यांनी प्रयत्न केले.