भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 16:30 IST2021-10-29T16:30:24+5:302021-10-29T16:30:37+5:30
अधिक उपचारासाठी जालना येथे घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
अंबड ( जालना ) : तालुक्यातील झिरपी फाट्याजवळ आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. पांडुरंग विठ्ठल पाष्टे असे मृत तरुणाचे नाव आहे.
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील तरुण पांडुरंग विठ्ठल पाष्टे वय ३० वर्षे हा घनसावंगी फाटा येथील एका ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये कामाला होता. पांडुरंग नियमितपणे घनसावंगी फाटा येथे दुचाकीवरून ( एम एच २१ बि आर ०५८९ ) येणेजाणे करत असे. आज सकाळी झिरपी फाट्याजवळ समोरून भरधाव येणाऱ्या एका कारने ( क्रमांक एम एच ११ बि व्हि ९७५५ ) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पांडुरंग गंभीर जखमी झाला.
दरम्यान, नागरिकांनी रुग्णवाहिकेतून जखमी पांडुरंगला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी जालना येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पांडुरंगचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आईवडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.