समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 20:11 IST2025-02-22T20:10:55+5:302025-02-22T20:11:36+5:30

पिकअपचे टायर फुटल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलण्यात आल्याने झाला अपघात

Two die after container hits pickup while trying to change tire in middle of Samruddhi Highway | समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू

जालना : भरधाव कंटेनरने पिकअपला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर इतर चौघे जण जखमी झाले. ही घटना नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरील सोमठाणा देवी मंदिर परिसरात चॅनल नंबर ३८५ जवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. पिकअपचे टायर फुटल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलण्यात येत असल्याने हा अपघात झाल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.

समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपचे (क्र.आर.जे.०८-जी.ए.६१७०) टायर शनिवारी पहाटे सोमठाणा देवी मंदिर परिसरात फुटले होते. त्यामुळे सोबत असलेले दुसरे पिकअप वाहन बाजूलाच लावून पंक्चर झालेले वाहन समृद्धी महामार्गाच्या मधोमध लावून टायर बदलण्याचे काम सुरू होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने (एन.एल.०१-ए.बी.९४४९) त्या पिकअपला जोराची धडक दिली.

या अपघातात दीपक बावरिया (वय-३५) आणि धर्मराज (वय-३० रा. राम ष्याई गणेश पुरा, देई बून्दी राजस्थान) या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर चौघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस विभागाचे पोलिस उपनिरीक्षक आडे, पोहेकॉ. पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून वाहने महामार्गाच्या बाजूला केली. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. अमोल ध्याडकर, आनंद बनसोडे, चालक आनंद भोरे, डॉ. सुनील वाघ यांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची बदनापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two die after container hits pickup while trying to change tire in middle of Samruddhi Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.