जालन्यात रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 13:15 IST2020-03-16T13:13:05+5:302020-03-16T13:15:32+5:30
संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करीत रोष व्यक्त केला.

जालन्यात रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू
जालना : येथील सुभाष चौक (मुथा बिल्डींग) येथे सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृध्दाला धडक दिली. या अपघातात वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत अदाहिक माहिती अशी की, शहरातील सुभाष चौकात सकाळी ८ वाजेच्या सुमारास एक वृद्ध इसम रस्ता ओलांडत होता. याच दरम्यान एका भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यामुळे वृद्ध दूर फेकला गेला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करीत रोष व्यक्त केला.
दरम्यान, घटनेनंतर ट्रक चालकाने पळ काढला असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ताब्यात घेतला. फरार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती सदरबाजार ठाण्याचे पोनि संजय देशमुख यांनी दिली. दरम्यान, मयत वृध्दाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.