जालन्याजवळ व्यापाऱ्याची मध्यरात्री गोळ्या घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 01:10 IST2020-01-12T01:10:26+5:302020-01-12T01:10:49+5:30
विविध गुन्ह्यांमध्ये संशयित होते राजेश नहार

जालन्याजवळ व्यापाऱ्याची मध्यरात्री गोळ्या घालून हत्या
जालना : विविध गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपी असलेले परतूर येथील व्यापारी राजेश नहार यांची शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जालना- मंठा महामार्गावरील वाटूर फाट्याजवळ अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेश नहार हे शनिवारी रात्री स्वत: कार चालवित परतूरकडे जात होते. त्यांची कार वाटूर फाट्याजवळ आली असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर गंभीर जखमी नहार यांना वाटसरूंनी उपचारासाठी जालना येथील मंठा चौफुलीजवळील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
नहार यांच्या उजव्या गालावर आणि डोक्यामध्ये गोळी लागल्याचे वैद्यकीय अधिकाºयांच्या तपासणीत समोर आले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंह गौर, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
जालना येथील प्रसिध्द व्यापारी विमलराज सिंघवी यांच्यावर गोळीबार करणे तसेच बांधकाम व्यवसायिक गौतमसिंह मुनोत यांच्या घरी हल्ला करून मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देणे आदी गुन्ह्यांमध्ये राजेश नहार यांना स्थानिक गुन्हे शाखेने मागील महिन्यात अटक केली होती.