आज बैलपोळ्याचा उत्साह हरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:34+5:302021-09-06T04:34:34+5:30
जालना : बैलपोळा म्हटले की, गावा-गावांत बैलांना चांगल्या प्रकारे सजविण्याची स्पर्धा व्हायची. बैलांच्या निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये वेगळाच उत्साह आणि आनंद ...

आज बैलपोळ्याचा उत्साह हरवला
जालना : बैलपोळा म्हटले की, गावा-गावांत बैलांना चांगल्या प्रकारे सजविण्याची स्पर्धा व्हायची. बैलांच्या निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये वेगळाच उत्साह आणि आनंद असायचा. आज बैलपोळा सण साजरा केला जातोय; परंतु बैलांची संख्या घटल्याने तो उत्साह दिसत नाही. बैलांची सजावट असो किंवा मिरवणुकीतील उत्साह असो तो पहिल्यासारखा दिसून येत नाही. त्यात कोरोनाने या सणावर परिणाम केल्याची खंत अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
बैलपोळा म्हटले की, पंधरा ते वीस दिवसांपासून तयारी सुरू व्हायची. बैलांना सजविण्यासाठी लागणारे बहुतांश साहित्य दोऱ्यापासून घरीच तयार केले जायचे. बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांना कामामधून उसंत दिली जायची. नव्हे बैलांप्रती असलेला आदर व्यक्त केला जायचा. आज बैलपोळा सण साजरा केला जातो; परंतु आमच्या लहानपणी असलेला उत्साह आणि त्या सणाची चालणारी धामधूम आज कुठेतरी हरवली असल्याची खंतही अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कोट
पोळ्याच्या दिवशी आम्ही सकाळीच बैल धुण्यासाठी पाण्यात घेऊन जायचो. बैलांसाठी घरीच गोंडे तयार करणे, कासरा तयार करणे अशी कामे केली जायची. पोळ्याच्या दिवशी गावातील बैलांची भव्य मिरवणूक काढली जायची. बैलांची मानाची पूजा व्हायची. आमच्या लहानपणी बैलपोळ्याचा उत्साह वेगळाच होता.
-गोपीनाथ शिनगारे- खादगाव
वीस वर्षांपूर्वी आमच्या काळात पोळा म्हणजे मोठा उत्सव असायचा. त्याची तयारी अगोदरच पंधरा दिवसांपासून चालायची. तागापासून सूत (दोर) तयार करणे आदी कामे आम्ही आवर्जून करायचो. बैलांना सजविणे असो किंवा त्यांची मिरवणूक काढणे असो त्याचा आनंद हा वेगळाच होता.
-आसाराम मोरे- खादगाव
आमच्या लहानपणी पोळा सण म्हणजे आनंदाचा क्षण आसायचा. मोठ्या आदराने गावातील लोकांना जेवणासाठी बोलावले जायचे. पोळा सणाची तयारी आठवडाभर अगोदर केली जायची. बैलाचा साज गोंडे, घागरमाळा, वेसणी आदी घरीच तयार केले जात होते. पळसाच्या मुळ्यापासून गोंडे बनवले जात होते. बैलांना तीन ते चार दिवस कामात उसंत दिली जात असे.
-प्रेमचंद भंडारी, रांजणी
आमच्या लहानपणी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळीही या सणात उत्साहाने सहभागी व्हायचे. गावातून बैलांची वाजत-गाजत मिरवणूक निघायची. बैलांच्या मिरवणुका पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची.
-जगन्नाथ नाझरकर, वडीगोद्री
आमच्या लहानपणी साजरा होणारा बैलपोळा आणि आजचा बैलपोळा या सणाला साजरे करण्यात बदल झाले आहेत. आधुनिकीकरणात बैलांची संख्या कमी झाली. सजावटीचे आयते साहित्य मिळू लागले आहे. त्यामुळे आज केवळ पोळ्याच्या दिवशीच बैलपोळा सणाचा आनंद साजरा होतो.
-रामेश्वर धुमाळ, वडीगोद्री