रील्सला कमेंट करणे भोवले; खोतकर पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी, आणखी दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:15 IST2025-04-28T17:11:35+5:302025-04-28T17:15:02+5:30
अल्पवयीन मुलाने धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडीओवर दोघांनी कमेंट केल्या होत्या.

रील्सला कमेंट करणे भोवले; खोतकर पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी, आणखी दोघे ताब्यात
जालना : येथील शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला गोळ्या घालून जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रविवारी आणखी दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना नांदेड व पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. सतीश पांडुरंग शिंदे (रा. हिमायतनगर,नांदेड) व आंतेश्वर बाबू मुंडकर (पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले की, इन्स्टाग्रॉमवरील एका व्हिडीओवर आ. अर्जुन खोतकर व त्यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांना गोळ्या झाडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या कमेंट्स काही जणांनी पोस्ट केल्या होत्या. या प्रकरणात व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला तालुका पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यानंतर त्या व्हिडीओवर कॉमेंट करणाऱ्या आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची नावे सतीश शिंदे व आंतेश्वर मुंडकर अशी आहेत. या संदर्भात संशयितांकडे अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उनवणे यांनी दिली.
एक शेतगडी अन् दुसरा टॅक्सी ड्रायव्हर
अल्पवयीन मुलाने धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडीओवर सतीश पांडुरंग शिंदे व आंतेश्वर बाबू मुंडकर यांनी कमेंट केल्या होत्या. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. आमदार खोतकर यांना ओळखतसुद्धा नसल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. आंतेश्वर मुंडकर हा ट्रॅक्सी ड्रायव्हर आहे. तर सतीश शिंदे हा शेतगडी आहेत. दरम्यान या दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे.