‘त्या’ पाण्याचे नमुने पाठविले प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:41 IST2018-06-18T00:41:51+5:302018-06-18T00:41:51+5:30
नदीपात्रात वाहून आलेले पाणी शहराला पिण्यासाठी सोडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या बाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच तहसीलदार जे.डी. वळवी यांनी शनिवारी नदीपात्रातील साचलेल्या पाण्याची पाहणी केली.

‘त्या’ पाण्याचे नमुने पाठविले प्रयोगशाळेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : नदीपात्रात वाहून आलेले पाणी शहराला पिण्यासाठी सोडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या बाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच तहसीलदार जे.डी. वळवी यांनी शनिवारी नदीपात्रातील साचलेल्या पाण्याची पाहणी केली. आणि पाण्याचे नमुने जालना येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले.
नदीच्या डबक्यातील पाणी मोटारच्या मदतीने ते पाणीपुरवठ्याच्या वहिरीत सोडण्यात आले. आणि नंतर तेच पाणी नळाव्दारे शहरात सोडण्यात आले. हे पाणी एवढे गढूळ का आले, याचा शोध दक्ष नागरिकांनी घेतला असता मोठी धक्कादायक बाब समोर आली होती. जाफराबाद नगर पंचायतीकडून पूर्णा नदीच्या पात्रातील साचले दूषित पाणी नळांना आल्याचे दिसून आले. या बाबत तहसीलदार वळवी यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर लगेचच वळवी यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसह पूर्णा नदीपात्रातील त्या खड्ड्याची पाहणी केली. तसेच त्या पाण्याचे नमुने घेऊन ते जालन्यातील पाणी तपासणी प्रयोगशाळेकडे पाठवले असून, तातडीने अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एकूणच सध्या पाऊस लांबल्याने जाफराबाद शहर व परिसरात पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी नगर पंचायतने पूर्णा नदीत हे खोल खड्डे खोदले असून, त्यात आलेले पावसाचे पाणी थेट नागरिकांना सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याशी एक प्रकारे खेळ केल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखवली. दूषित पाण्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण काही अंशी वाढल्याचे सांगण्यात आले.