शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:19 IST2020-03-06T00:19:45+5:302020-03-06T00:19:56+5:30
अंबड तालुक्यातील रोहिलागड शिवारातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला

शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड शिवारातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला. चोरट्यांनी वृध्द दाम्पत्यास जबर मारहाण रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
केले.
रोहिलागड गावच्या शिवारातील शेतवस्तीवर दादाराव नाथा मगरे (६४) व त्यांची पत्नी निलाबाई दादाराव मगरे (६०) हे राहतात. बुधवारी मध्यरात्री तीन चोरांनी मगरे यांच्या घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला.
तीन चोरांनी लोखंडी रॉड, दांड्यांनी मगरे दाम्पत्यास मारहाण केली. घरातील रोख १६ हजार रूपये व सोन्याच्या दोन पोत घेऊन चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत मगरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, दादाराव मगरे यांचा हात मोडला आहे. तर निलाबाई यांच्या पायाला जबर मार लागला आहे. दोन्ही जखमींवर औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस पोलीस अधीक्षक सी. डी. शेवगन, पोउपनि सुग्रीव चाटे, जमादार व्ही. पी. लोखंडे, कुटे, गायके, लहाने, जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेची गुरूवारी सायंकाळपर्यंत अंबड पोलिसात नोंद सुरू होती. एकूण किती रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला ? याची माहिती पोलिसांनी उशिरापर्यंत दिली नाही. अधिक तपास पोनि अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश शेजूळ हे करत आहेत.