शेतीपूरक ६५ उद्योग होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:28 IST2019-08-24T00:28:16+5:302019-08-24T00:28:42+5:30
शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत, सहकाराला बळकटी मिळावी यासाठी शासनाने जालना जिल्ह्याला ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

शेतीपूरक ६५ उद्योग होणार सुरू
विजय मुंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत, सहकाराला बळकटी मिळावी यासाठी शासनाने जालना जिल्ह्याला ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीद्वारे जिल्ह्यातील ६५ सहकारी संस्थांचे शेतीपूरक उद्योग सुरू होणार आहेत. शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू होणार असल्याने याचा शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे.
खासगी उद्योग, व्यवसायांमुळे सहकार क्षेत्राला घरघर लागली आहे! याचा थेट परिणाम शेतकरी, शेतमजुरांवर झाला आहे. त्यात दुष्काळाचे सावट सतत निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी मोडली आहे. परिणामी हाताला काम मिळावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून ग्रामीण भागातील युवकांचा शहराकडे ओढा वाढला असून, गावे ओस पडू लागली आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतीपूरक उद्योग गावा-गावात सुरू होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने शासनाने शेती उत्पादीत मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत, यासाठी पावले टाकली आहेत. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांनी उद्योग सुरू करावेत, सहकाराला बळकटी मिळावी यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत (एम.सी.डी.सी.) सहकारी संस्थांना उद्योगासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. जालना जिल्ह्यासाठी ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. दाखल प्रस्तावांच्या छाननीनंतर हे प्रस्ताव महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडे पाठविण्यात आले होते. तेथून ६३ संस्थांच्या उद्योगांना मंजुरी मिळाली असून, उर्वरित दोन प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. शेतीपूरक मालावर प्रक्रिया होणारे उद्योग ग्रामीण भागात सुरू झाल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.