'...तर तुम्हाला ५ वर्ष सुखाने खाऊ देणार नाही'; जरांगेंचा सरकारला सायंकाळपर्यंतचा अल्टीमेटम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:14 IST2025-01-29T14:13:22+5:302025-01-29T14:14:00+5:30
तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही तर तुम्हाला ५ वर्ष सुखाने खाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा

'...तर तुम्हाला ५ वर्ष सुखाने खाऊ देणार नाही'; जरांगेंचा सरकारला सायंकाळपर्यंतचा अल्टीमेटम
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : ''आमच्या मागण्या पूर्ण होतील की नाही ते सांगावं, अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिल नाही तर तुम्हाला ५ वर्ष सुखाने खाऊ देणार नाही'', असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, संध्याकाळपर्यंत सांगून टाका, अंमलबजावणी करायची की नाही सांगून टाका. तोंड लपवू नका. आपल्या म्हणण्याचा दुसरा कोणताही उद्देश नाही. आपला उद्देश फक्त मागण्या पूर्ण होण्याचा आहे. मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण होईल की नाही हे सांगावं. आम्हाला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येईल असं वाटत नव्हतं. आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं, अशी मागणी जरांगे यांनी केली.
आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या
मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागे पुढे सरकू शकतो. पण स्वार्थासाठी नाही. यातच जातीच कल्याण आहे. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे. तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही. आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको. पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय. सगळे मेल्यावर सांगू नका. दहा दिवसांनी सांगितल्यापेक्षा, आजच सांगून टाका. संध्याकाळपर्यत सांगून टाका, म्हणजे उपोषण सोडून देऊन दुसरा मार्ग स्विकारता येईल, असा अल्टीमेटम जरांगे यांनी फडणवीस सरकारला दिला.