चोरी प्रकरणातील मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:51 IST2019-04-15T00:50:31+5:302019-04-15T00:51:05+5:30
गुरु गणेश भवन येथून तीन महिन्यापूर्वी एका परराज्यातील महिलेच्या चोरीला गेलेली रोख रक्कम आणि दागिने हस्तगत करण्यात सदर बाजार पोलिसांना अखेर यश आले आहे

चोरी प्रकरणातील मुद्देमाल हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील गुरु गणेश भवन येथून तीन महिन्यापूर्वी एका परराज्यातील महिलेच्या चोरीला गेलेली रोख रक्कम आणि दागिने हस्तगत करण्यात सदर बाजार पोलिसांना अखेर यश आले आहे. मात्र दागिने चोरणारी महिला अद्यापही फरार असून तिचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कर्नाटकातील मल्लेश्वरम (बंगळुरू) येथील मंजुदेवी सिंघवी (४३) जानेवारी महिन्यात जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुगणेशलाल महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी कुटुंबासह आल्या होत्या. त्यावेळी समाधीचे दर्शन घेत असताना त्यांची पर्स चोरी गेली होती. या पर्समध्ये ७० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख १५ हजार रुपये होते. या प्रकरणी १८ जानेवारी रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरु गणेश भवन मधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास चक्रे फिरविली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला मंजुदेवी यांनी दर्शन करताना बाजूला ठेवलेली पर्स उचलून घेऊन घाईगडबडीने एका कारमधून निघून जात असल्याचे पडताळणीतून निष्पन्न झाले. सदर बाजार पोलिसांनी मिळालेल्या माहिती तपास करुन शहरातील एका घरासमोर लावलेली कार (एमएच-२१, एएक्स- १२२२) जप्त केली. मात्र सदर महिला अद्यापही फरार असून तिचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पर्स चोरी करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. सदर महिलेने चोरलेला मुद्देमाल गणेश भवन येथील दानपेटीत टाकल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. सदर बाजार पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो. नि. संजय देशमुख यांनी दिली आहे.