पप्पा मला घाम आलाय म्हणताच तरुणाचा मृत्यू
By दिपक ढोले | Updated: July 20, 2023 19:33 IST2023-07-20T19:32:35+5:302023-07-20T19:33:37+5:30
ही धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील वाडी खुर्द येथे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

पप्पा मला घाम आलाय म्हणताच तरुणाचा मृत्यू
भोकरदन : पप्पा मला घाम आलाय, असे म्हणताच एका तरुणाचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील वाडी खुर्द येथे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. विकास नवल (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे.
वाडी खुर्द येथील शेतकरी गुलाबराव रामा नवल हे आपल्या दोन्ही मुलांसह गुरुवारी सकाळी शेतात गेले होते. दोन्ही मुलांना घेऊन त्यांनी सोयाबीनच्या शेतात कोळपणी सुरू केली. ११ वाजेच्या सुमारास विकास नवल हा त्यांच्याजवळ होता. त्याचवेळी पप्पा मला घाम येतोय, असे म्हणताच विकास जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याचा हदयविकाराच्या झडक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विकास हा पाथर्डी येथे बी.एस्सी. ॲग्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो काही दिवसांपूर्वीच गावाकडे आला होता. तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत होता. त्यातच गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने तिघेही जण शेतात गेले होते. तेथेच विकासचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.