मोठा वाळूसाठा जप्त, संतापलेल्या वाळू तस्कराची तहसीलदारांना कार्यालयात घुसून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 13:30 IST2023-02-23T13:28:20+5:302023-02-23T13:30:17+5:30
महसूल पथकाने गोंदी व साष्टपिंपळगाव येथे कारवाई करून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त केला आहे.

मोठा वाळूसाठा जप्त, संतापलेल्या वाळू तस्कराची तहसीलदारांना कार्यालयात घुसून मारहाण
जालना : गोंदी व साष्टपिंपळगाव येथे कारवाई करून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त केल्याचा राग मनात धरून अंबडच्या तहसीलदारांना वाळूमाफियाने तहसील कार्यालयात येऊन शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या फिर्यादीवरून संशयित पंकज सखाराम सोळुंके (रा. गोंदी, ता. अंबड) याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार विद्याचरण कडवकर हे बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात कामकाज करीत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित पंकज सोळुंके हा तेथे आला. त्याला शिपायांनी बाहेरच थांबण्याचे सांगितले; परंतु तो थांबला नाही अन् कार्यालयात गेला. तू माझा फोन का उचलत नाही, काल आमचा गोंदी व साष्ट पिंपळगाव येथील वाळूसाठा का जप्त केला? माझा फेरफार का मंजूर केला नाही, असे म्हणून पंकज हा तहसीलदार कडवकर यांना शिवीगाळ करू लागला. नंतर त्याने तहसीलदारांना मारहाण केली. दोन कानाखाली वाजवून खांद्याला मारले. त्याचवेळी नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने त्याला ओढत बाहेर काढले. नंतर त्याने शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देऊन तो फरार झाला. याची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या फिर्यादीवरून संशयित पंकज सखाराम सोळुंके याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेरफार मंजूर न केल्याचा राग मनात
मंगळवारी तहसीलदार कडवकर यांनी गोंदी व साष्ट पिंपळगाव येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी संभाजी खराद या संशयिताच्या विरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय, संशयिताचा फेरफार मंजूर न केल्यामुळे त्याने हा प्रकार केला आहे.