फळगळीने मोसंबीचा पडला भाव, शेतकऱ्यांची भरपाईसाठी शासनाकडे धाव
By रवी माताडे | Updated: August 17, 2023 18:55 IST2023-08-17T18:55:11+5:302023-08-17T18:55:11+5:30
पंचनामे करून विमा रकमेसह आर्थिक मदतीकडे मोसंबी उत्पादकांचे लक्ष

फळगळीने मोसंबीचा पडला भाव, शेतकऱ्यांची भरपाईसाठी शासनाकडे धाव
जालना : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली मोसंबीची फळगळ उपाययोजना करूनही थांबता थांबेना., त्यातच ३५ ते ४० हजार रुपये टन भाव देणारी मोसंबी आता १२ ते १६ हजार रुपये देत आहे, त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी तसेच मोसंबीचा विमा तत्काळ देण्याची कार्यवाही करावी., यासाठी उत्पादकांचे लक्ष आता शासनाकडे लागले आहे.
आंबे बहाराच्या मोसंबीची फळगळ होत असल्याने भावही पडले आहे. व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दराने ही मोसंबी खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात १२ रुपये ते १६ रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव पडत आहे. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान मोसंबी उत्पादकांना सोसावे लागत आहे. हौशीराम मेरगळ, दादा मेरगळ, नितीन मेरगळ आदी कृषी पदविकाधारक शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देऊन मार्गदर्शन करत आहेत.
ढगाळ वातावरणामुळे प्रकाश संश्लेषणाच्या दृष्टिकोनातून काही फवारण्या गरजेच्या होत्या. योग्य वेळी त्या फवारण्या झाल्या नसल्याने बुरशीचा प्रादुर्भाव वाढला, असे मत कृषी पदविकाधारकांनी वर्तविले आहे.
आंबेबहराच्या मोसंबीचा विमा तत्काळ मिळावा...
एचडीएफसी आरगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने तत्काळ दखल घ्यावी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी मोसंबीला संरक्षण मिळावे, यासाठी प्रति हेक्टर चार हजार रुपये शेतकऱ्यांचा हिस्सा भरून विमा काढलेला आहे. महिनाभरापासून फळगळ सुरू असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासन, प्रशासनाने विमा कंपन्यांना सूचना देऊन, झालेल्या नुकसानीचा विमा देण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी रामदास कावळे, प्रकाश धुमाळ, भगवानराव डोंगरे, विष्णू आटोळे, सोपान लोखंडे, प्रभाकर मोरे, रामेश्वर पडूळ यांनी केली आहे.
नुकसानभरपाई मिळावी
साडेसातशे ते आठशे मोसंबीच्या झाडावर आपल्याला ९० ते १०० टनापर्यंत मोसंबीचे उत्पादन झाले असते, असे खुद्द व्यापाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत जवळपास १६ ते १७ टन मोसंबीची फळगळ झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या भावामध्ये मोसंबी विक्री करावी लागत आहे. फळगळीमुळे १२ ते १६ रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- अनिल देशमुख, मोसंबी उत्पादक