प्रेमविवाह केलेल्या मुलीचे सासर घरात घुसून आईनेच केले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 15:59 IST2023-04-22T15:58:51+5:302023-04-22T15:59:45+5:30

दीड महिन्यापूर्वी गावातीलच एका मुलासोबत मुलीने प्रेमविवाह केला होता. पण मुलीच्या आईला हे लग्न पसंत नव्हते.

The mother kidnaped her own daughter because of love marriage | प्रेमविवाह केलेल्या मुलीचे सासर घरात घुसून आईनेच केले अपहरण

प्रेमविवाह केलेल्या मुलीचे सासर घरात घुसून आईनेच केले अपहरण

राजूर (जि. जालना) : मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून नातेवाइकांच्या मदतीने आईनेच मुलीचे अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील राजूर येथे गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिद्धेश्वर नारायण साबळे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजूर येथील सिद्धेश्वर नारायण साबळे यांचा दीड महिन्यापूर्वी गावातीलच एका मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. मुलीच्या आईला हे लग्न पसंत नव्हते. सिद्धेश्वर साबळे हे आपल्या पत्नीसोबत राजूर येथील घरात राहतात. मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरून गुरुवारी दुपारी मुलीची आई नातेवाइकांसह घरात घुसली. नंतर फिर्यादीच्या आईला व बायकोला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या बायकोला जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात बसवून घेऊन गेली. या प्रकरणी सिद्धेश्वर साबळे यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिस ठाण्यात संशयित भगवान शिंदे यांच्यासह मुलीची आई व तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. वैशाली पवार, फौजदार शिवाजी देशमुख हे करीत आहेत.
 

Web Title: The mother kidnaped her own daughter because of love marriage