पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळली; सहा वारकऱ्यांचा मृत्यू
By विजय मुंडे | Updated: July 18, 2024 18:29 IST2024-07-18T18:27:18+5:302024-07-18T18:29:31+5:30
राजुर ते जालना रोडवरील वसंतनगर शिवारातील विहिरीत पडली जीप

पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळली; सहा वारकऱ्यांचा मृत्यू
जालना : समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जावून पडली. यात पंढरीहून घराकडे परतणाऱ्या सहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सायंकाळी जालना- राजूर मार्गावरील वसंतनगर शिवारात घडली.
पंढरीहून आलेले काही वारकरी जालना येथे एका जीपमध्ये बसून राजूरकडे जात होते. ती जीप वसंतनगर शिवारात आली असता समोरून दुचाकी अडवी आली. त्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतकरी, कामगारांनी तातडीने विहिरीकडे धाव घेत विहिरीत पडलेल्या वारकऱ्यांना बाहेर काढणे सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत काही जणांना वाचविण्यात आले असून, सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलिस अधिकारी, अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले आहेत.