सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:35 IST2025-08-23T11:35:18+5:302025-08-23T11:35:34+5:30
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे मोर्चा; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
- पवन पवार
वडीगोद्री (जालना) : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या उपसमितीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने मराठा समाजाला 'येड्यात काढू नये', असे सुनावत, ही समिती म्हणजे 'जुनेच खुळ' असून 'फक्त खांदे बदलले पोळ्याच्या दिवशी', असा टोला त्यांनी लगावला आहे.
अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली. 'आमचं म्हणणं सरकारच्या डोक्यात येत नाही, सरकार किडे पडल्यासारखं वागायला लागलं आहे,' असा संताप त्यांनी व्यक्त केला.
'या' मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी करा
जरांगे पाटील यांनी सरकारने तातडीने काही महत्त्वाच्या मागण्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
- मराठा-कुणबी एक आहे, असा जीआर काढावा.
- यासाठी तातडीने कॅबिनेट बैठका घ्या.
- केसेस मागे घ्या आणि शहीद झालेल्या कुटुंबांना मदत द्या.
- 'सगे सोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करा.
- हैदराबाद व सातारा संस्थानांच्या गॅझेटसाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलवा.
मुंबईकडे मोर्चा काढण्याचा इशारा
सरकारने जर आमच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर आम्ही मुंबईला येऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. 'तुम्ही दिशाभूल करणारे काम करू नका, मराठ्यांना येड्यात काढायचे बंद करा,' असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
उपसमिती जुनीच
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, उपसमिती स्थापन करणे आणि त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 'उपसमिती तर पूर्वीच होती, फक्त आता दुसरे कोणीतरी अध्यक्ष झाले आहे,याला आमच्याकडे खांदे बदल म्हणतात' असे म्हणत त्यांनी सरकारची कृती निव्वळ पोकळ असल्याचे सांगितले.