वडीगोद्री (जालना): उद्यापासून राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची धामधूम सुरू होत असताना, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चांगलाच गाजू लागला आहे. पुढील दहा दिवस मुंबईत गणेशोत्सवाची रेलचेल असेल. अशा संवेदनशील काळात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्टपासून मुंबईकडे मोर्चा नेण्याचा निर्धार केल्याने सरकारसमोर कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे.
गणेशोत्सवाला नुकताच राज्य महोत्सवाचा दर्जा दिला गेला आहे. त्यामुळे लाखो भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असताना, जरांगे यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी आज दुपारी अंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. मात्र, चर्चेनंतरही जरांगे यांनी आपली भूमिका कायम ठेवली असून “मोर्चा काढणारच” असा ठाम निर्णय जाहीर केला आहे.
यावेळी जरांगे म्हणाले की, आम्ही अडचण येऊ नये म्हणून शहरातून ही जाणार नाहीत. आम्ही मधून कुठे गेलो तर अडथळा आणतोय याचा अर्थ होतो. आझाद मैदानावर मिरवणूक येत नाहीत. त्यामुळे आम्हाला तुम्ही संध्याकाळपर्यंत रस्ता सांगितला तरी काही अडचण नाही. ५८ लाख नोंदींचा अहवाल दिला. आता आरक्षण द्यायला काय हरकत आहे. आजच अंमलबजावणी करा कशाला रॉड मॅप टाकायला लावता, असे आवाहन जरांगे यांनी केले. तर आता माझ्या हातात काही राहिले नाही. मी थोड्या दिवसाचा पाहुणा असल्याचे भावनिक उद्गार त्यांनी काढले. तुम्ही साक्षीदार आहेत, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सुरेश धस यांना पाठवले होते. समाज शांततेत येणार आहे. उलट तुम्ही सेवा करायला पाहिजे. संध्याकाळ पर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्याचे ओएसडी साबळे यांनी यावेळी फार बोलण्यास नकार दिला. ''दादा, तुम्ही आम्हाला मॅप द्या, मी मुख्यमंत्री यांच्याकडे निरोप देईल.'' एवढेच साबळे चर्चेच्या दरम्यान म्हणाले. तसेच माध्यमांसोबत बोलताना साबळे यांनी, मी केवळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घ्यायला आलो होतो. त्यांची यासंदर्भात काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो, अशी प्रतिक्रिया दिली.