"सरकार आडमुठं, आम्ही नाही"; मागण्या मान्य करूनच मुंबई सोडणार: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:04 IST2025-08-25T15:04:04+5:302025-08-25T15:04:30+5:30
"२७ ऑगस्टला अंतरवालीहून मुंबईकडे कूच; २९ ला आझाद मैदानावर आरक्षणाची लढाई"

"सरकार आडमुठं, आम्ही नाही"; मागण्या मान्य करूनच मुंबई सोडणार: मनोज जरांगे
वडीगोद्री ( जालना): मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण बेमुदत सुरू करणार, अशी जाहीर घोषणा करत त्यांनी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर मुंबईत उतरायचे आवाहन केले. तसेच मराठा-कुणबी एकच असल्याने आरक्षणाशिवाय मुंबईतून मागे हटणार नाही, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला.ते आंतरवली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
जरांगे पाटील म्हणाले, "२७ ऑगस्टला अंतरवाली सराटीतून निघून २८ रोजी शिवनेरी किल्ला आणि पवित्र मातीतून प्रेरणा घेऊन आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत. सरकारने २६ तारखेपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर आम्ही थेट आझाद मैदानावर उपोषणाला बसू."
नेमक्या मागण्या मांडताना त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की,
- मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्याबाबत जीआर काढला तरी सरकार आडमुठेपणा करत आहे.
- हैद्राबाद गॅझेट लागू करावे, केवळ अभ्यास सांगून वेळ मारून नेता कामा नाही.
- खोटे गुन्हे मागे घ्यावेत, बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना मदत व नोकऱ्या द्याव्यात.
- सगे सोयरेची अधिसूचना तातडीने अंमलात आणावी, दोन वर्षे वेळ दिला तरी सरकार टाळाटाळ करत आहे.
मुंबईतून रिकाम्या हाताने जाणार नाही
"सरकार आडमुठं आहे, आम्ही नाही. आरक्षण ही आमच्या जगण्याची लढाई आहे. मुंबईत आलो की परत रिकाम्या हाताने जाणार नाही. मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ," असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
भजनाच्या माध्यमातून होणार आंदोलन
चळवळीला शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी "जाळपोळ नाही, दंगल नाही, फक्त संघटित लढा द्यायचा" अशी अट घातली आहे. मुंबईत किर्तन, पोवाडे आणि भजनाच्या माध्यमातून आंदोलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
... तर मराठा समाज इतिहास घडवेल
"२९ ऑगस्टला आरक्षण घेऊनच उठणार. सरकारने अंमलबजावणी केली नाही, तर मराठा समाज इतिहास घडवेल," असे ठाम वक्तव्य करून जरांगे यांनी राज्य सरकारसमोर पुन्हा एकदा नवीन आव्हानं उभे केले आहे.