पित्यानेच केले साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:18 IST2023-09-19T13:16:35+5:302023-09-19T13:18:52+5:30
शहरातील कांचननगर परिसरातील घटना, कदीम पोलिसांची कारवाई

पित्यानेच केले साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका
जालना : साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या पित्याला कदीम जालना पोलिसांनी अकोला शहरातून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कदीम जालना पोलिसांनी मंगळवारी सकाळी केली आहे.
शहरातील कांचननगर भागातील एका ३७ वर्षीय महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी अकोला येथील योगेश नरेंद्र परमार याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झालेली आहे. ती सध्या साडेपाच वर्षाची आहे. या पती-पत्नीत आपसांत वाद होत असल्याने त्यांनी न्यायालयामार्फत घटस्फोट घेतला आहे. घटस्फोट मंजूर करतांना न्यायालयाने मुलीचा ताबा तिच्या आईकडे दिला आहे. वडिलांना दरमहिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी ३ ते ५ वेळेत कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात मुलीला भेटण्याची परवानगी दिलेली आहे.
दरम्यान, सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर मुलीग व्हॅनमधून नेहमीप्रमाणे घरी येत होती. स्कूल व्हॅनमधून उतरल्यानंतर घराजवळून त्या मुलीचे एका कारमधून आलेल्या तिघांनी अपहरण केले. याप्रकरणी कदीम ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी लहान मुलीच्या अपहरणाचा प्रकार असल्याने ही घटना गांभीर्याने घेत तातडीने सूत्रे हलविली असता, मुलीचे अपहरण तिच्या पित्यानेच केल्याचे समोर आले.
यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस अंमलदार रामेश्वर राऊत, दिलीप गायकवाड, शुभदा पाईकराव यांचे एक पथक अकोल्याला रवाना झाले. या पथकाने रात्रीच अकोला गाठून मुलीचे वडील योगेश परमार याचे घर गाठले. मात्र तो घरी आढळून आला नाही. त्यानंतर अकोला शहरातील सर्व हॉटेलची तपासणी केली असता, एका प्रशस्त हॉटेलमध्ये तो आढळून आला. येथून मुलीची सुटका करून, योगेश परमार यास पोलिसांनी ताब्यात घेतले.