विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:55 IST2025-06-10T16:53:48+5:302025-06-10T16:55:29+5:30

जालन्यातील वरुडमध्ये शेतातील दुःखद घटना; पित्याबरोबर दोन्ही लेकरांचा मृत्यू

The father died from an electric shock, the two children came with water and their lives were also over! | विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!

विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!

जालना: जालना तालुक्यातील वरुड शिवारात आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शेतात मल्चिंग पन्नी बसवत असताना विद्युत प्रवाहाचा धक्का बसून वडील विनोद तुकाराम मस्के (वय ३५) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मदतीला धावून आलेल्या दोन निष्पाप चिमुकल्यांचा श्रद्धा मस्के (वय ११) आणि समर्थ मस्के (वय ८) या दोघांचा देखील विद्युत प्रवाहाचा जबर धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला.

वडिलांसाठी दोन्ही मुले पाणी घेऊन आली होती. मात्र, वडिलांच्या स्पर्शात असलेल्या विजेच्या प्रवाहाने त्यांनाही झटकले. काही क्षणातच दोन्ही मुलं वडिलांच्या अंगावर कोसळली आणि तिथेच तिघांचा जीव गेला. काही वेळानंतर मुले घरी परतली नाहीत म्हणून आई शेताकडे आली. समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जामीन सरकली. नवऱ्याचा आणि दोन्ही मुलांचा मृतदेह पाहून तीने हंबरडा फोडताच आवाज ऐकून शेजारील शेतकरी धावत आले, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. 

Web Title: The father died from an electric shock, the two children came with water and their lives were also over!