राजूर-देऊळगाव राजा महामार्गावर भीषण अपघात; एक जागीच ठार, ३० जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:58 IST2025-12-18T11:57:28+5:302025-12-18T11:58:03+5:30
अपघात इतका भीषण होता की टेम्पोमधील मजूर रस्त्यावर फेकले गेले.

राजूर-देऊळगाव राजा महामार्गावर भीषण अपघात; एक जागीच ठार, ३० जण गंभीर जखमी
जालना : राजूर-देऊळगाव राजा महामार्गावर गुरूवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. दाभाडी येथून काळेगाव येथे अद्रकीचे पीक काढण्यासाठी मजूर घेऊन जाणाऱ्या टेम्पो व मोपेड यांची देळेगव्हाण परिसरातील बुद्ध विहारासमोर समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत टेम्पो रस्त्यावर उलटून त्यातील ३० जण जखमी झाले आहेत. तर मोपेडस्वार रमेश किसन जाधव (रा. टेंभुर्णी) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की टेम्पोमधील मजूर रस्त्यावर फेकले गेले. टेम्पोमध्ये महिला, पुरुष आणि काही लहान मुले असे २५ ते ३० प्रवास करत होती. या अपघातात अनेक महिला, पुरुष आणि लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. काही जखमींच्या हातापायांना फ्रॅक्चर झाले असून, काहींना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ रुग्णवाहिकेला फोन केला. जखमींना तातडीने टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉ. व आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार सुरू केले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे.