टेंभुर्णी : रात्रीची गस्त चालू असताना टेंभुर्णी पोलिसांनी चोरून पळवीत असलेली तीन जनावरे पकडली. मात्र चोरट्यांसह वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री टेंभुर्णी-जाफराबाद रस्त्यावरील जिजाऊ महाविद्यालयाजवळ घडली.
टेंभुर्णी पोलिसांची रात्रीची गस्त सुरू असताना रात्री २ वाजेच्या सुमारास एक व्यक्ती जाफराबादकडून टेंभुर्णीकडे मोटारसायकलीवर येत होता. दरम्यान, येथील भातोडी फाट्यावर पोलिसांची गाडी उभी दिसताच त्याने आपली मोटारसायकल मागे वळवून पळ काढला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीचा पाठलाग केला. मात्र पुढे जिजाऊ महाविद्यालयाजवळ पोलिसांना एक टेम्पो उभा असल्याचे दिसले. पोलिसांची गाडी येताना पाहून टेम्पोचालक व इतर जण पळून गेले. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात २ बैलजोडी व एक म्हैस त्यांना दिसून आली.
हा जनावरे चोरीचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे शेताच्या वाटेने पळून गेले. शेवटी पोलिसांनी जनावरे व गाडी पोलीस स्टेशनला जमा करून सदरील जनावरांचे फोटो पोलीस ग्रुपवर व्हायरल केले.
दरम्यान, चोरून नेलेली जनावरे भोकरदन तालुक्यातील देहेड येथील एका शेतकऱ्याची असल्याचे भोकरदन पोलिसांना सकाळी आलेल्या तक्रारीवरून कळाले. शेवटी भोकरदन पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल केंद्रे यांच्यासह संबंधित शेतकरी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला हजर झाले. जनावरांची ओळख पटल्यानंतर चोरीतील संपूर्ण मुद्देमाल भोकरदन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या जनावरांची किंमत जवळपास ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. ज्ञानेश्वर पायघन, फौजदार ज्ञानेश्वर साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रदीप धोंडगे, त्र्यंबक सातपुते, गणेश पवार, बळीराम तळपे, दिनकर चंदनशिवे, दुर्गादास कहाळे आदींच्या पथकाने केली.
चौकट-
टेंभुर्णी परिसरातूनही जनावरांची चोरी
दरम्यान, मागील पंधरा दिवसांपूर्वीच टेंभुर्णी व डोलखेडा बु. येथून काही जनावरे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या चोरट्यांचा त्या चोरीशी काही संबंध आहे का, हेही आता तपासात पुढे येईल.
फोटो- टेंभुर्णी पोलिसांनी पकडून आणलेली ती जनावरे पोलीस स्टेशन आवारात बांधली होती.