रेशन विक्रेत्यांवर नियंत्रणासाठी पथक
By Admin | Updated: November 28, 2014 01:10 IST2014-11-28T00:04:50+5:302014-11-28T01:10:25+5:30
जालना : अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चार पथके तयार केली असून या पथकांमार्फत रेशन विक्रेत्यांवर

रेशन विक्रेत्यांवर नियंत्रणासाठी पथक
जालना : अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चार पथके तयार केली असून या पथकांमार्फत रेशन विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात पुरवठा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठकीचेही आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सध्या दुष्काळाची छाया आहे. अनेक गावांमध्ये आतापासूनच टंचाई जाणवू लागली आहे. डिसेंबर आणि त्यानंतर टँकर व विहिर अधिग्रहणांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आढावा बैठकांद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येत आहेत. २०१२ सालच्या दुष्काळाची परिस्थिती पुन्हा उदभवू नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात हाती काहीच पडत नसल्याची खंत ग्रामीण भागातील जनतेतून व्यक्त होत आहे.
या परिस्थितीत जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी रेशन विक्रेत्यांना कडक सूचना केलेल्या आहेत. ग्रामीण भागाची लोकसंख्या १५ लाख ८१ हजार २५१ एवढी आहे. त्यापैकी १२ लाख ६ हजार ८११ शिधापत्रिकाधारक अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी आहेत. तर शहरी भागात ३ लाख ७७ हजार २३२ पैकी १ लाख ७१ हजार ३७ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
सदर योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ ते २० तारखेदरम्यान गहू, तांदूळ हे अन्नधान्य दिले जाते. परंतु काही ठिकाणी विक्रेते चार-पाच दिवस दुकान सुरू ठेवतात व नंतर अन्नधान्य संपले म्हणून सांगतात आणि दुकान नेहमी बंद असते, अशा प्रकारच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे येत आहेत. या तक्रारींची गांभिर्याने दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी माचेवाड यांनी रेशन विक्रेत्यांकडून दररोजची माहिती घेण्याच्या सूचना पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत प्रत्येक तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला सूचना देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)४
जिल्ह्यात १२८५ रेशन विक्रेते आहेत. लाभार्थ्यांनी अन्नधान्य मिळत नसल्यास संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामीण भागात ७६ टक्के लाभार्थी आहेत.
४अन्नधान्य मिळत नसल्याने स्थलांतर करण्याची वेळ कुणावर येऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष आहे. परंतु असा प्रकार कोठे आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही माचेवाड यांनी दिला आहे.