भर उन्हात रस्त्यात थांबलेल्या आजारी वृद्धेला पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 19:26 IST2025-04-17T19:26:28+5:302025-04-17T19:26:54+5:30

आस्थेवाईक विचारपूस करून वृद्धेच्या उपचाराची व्यवस्था करूनच पोलिस अधीक्षक परदेशी पुढील प्रवासासाठी गेले.

Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi provides support to a sick elderly man who was standing on the road in the scorching sun | भर उन्हात रस्त्यात थांबलेल्या आजारी वृद्धेला पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांचा आधार

भर उन्हात रस्त्यात थांबलेल्या आजारी वृद्धेला पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांचा आधार

अंबड ( जालना) : परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे गुरुवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहुन शासकीय कामकाज आटोपून अंबड-घनसावंगी मार्गे परत परभणीकडे जात होते. त्यांना अंबड शहरापासून काही अंतरावर असलेल्या घनसावंगी फाट्यावर भर उन्हात एक वयोवृद्ध आजी थांबलेली दिसली. हे दृश्य पाहून परदेशी यांनी लागलीच गाडी थांबली. स्वतः पुढे जाऊन परदेशी यांनी वृद्धेस आधार देत शेजारच्या झाडाच्या सावलीत बसवले. पाणी देऊन आस्थेवाईक विचारपूस केली. प्रकृती ठीक नसल्याचे समजताच वृद्धेच्या उपचाराची व्यवस्था करूनच पोलिस अधीक्षक परदेशी पुढील प्रवासासाठी गेले.

घनसावंगी फाट्यावर भर उन्हात वार्धक्याने जर्जर झालेल्या आजी थांबल्या होत्या. त्यांच्या पायातील वाहना देखील अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. वयोमानानुसार बोलताही येत नव्हतं. धावत्या वाहनातून पोलीस अधीक्षक परदेशी यांची त्यांच्यावर नजर गेली आणि त्यांनी वाहन थांबवले. आजीला स्वतःजवळ असलेले पाणी पाजून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. स्वतः आधार देत शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत त्यांना बसवले. एवढेच नव्हे तर आजीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, काठी आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली नेऊन दिली. 

चौकशी दरम्यान, वृद्धेची तब्येत ठीक नसल्याचे समजले. त्यानंतर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना मोबाईलवरून संपर्क करत वृद्धेस उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी बारवाल यांनी तातडीने पोलीस हवालदार विष्णू चव्हाण आणि स्वप्नील भिसे यांना तातडीने शासकिय वाहन घेऊन घनसावंगी फाट्यावर पाठविले. पोलिसांचे वाहन आल्यानंतर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी वृद्धेस पोलीस वाहनात बसवून दिले. त्यानंतरच ते परभणीकडे रवाना झाले.

दरम्यान, वृद्ध महिलेस अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्या अंबड तालुक्यातील बेलगांव येथील रहिवासी आहेत. पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या माणुसकीचे दर्शन यावेळी नागरिकांना झाले. तसेच अंबड पोलिसांनी देखील लागलीच वृद्धेस उपचारासाठी दाखल केल्याने खाकीतील माणुसकीची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

Web Title: Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi provides support to a sick elderly man who was standing on the road in the scorching sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.