बारचा परवाना नूतनीकरणासाठी लाच घेताना एक्साईजचा दुय्यम निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 20:27 IST2023-05-03T20:16:03+5:302023-05-03T20:27:05+5:30
उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच १५ हजार रुपयांची लाच घेताना दुय्यम निरीक्षकास अटक

बारचा परवाना नूतनीकरणासाठी लाच घेताना एक्साईजचा दुय्यम निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- फकिरा देशमुख
भोकरदन : परमिटरूम आणि बारचे नूतनीकरण करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक संजय पवार यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने भोकरदन येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान केली.
या बाबतीत मिळालेली माहिती अशी की, माहोरा येथील एका बिअरबार व परमिट रूमचे परवाना नूतनीकरण करण्याचे काम प्रलंबित होते. यासाठी भोकरदन येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक संजय महादेव पवार ( ४६ ) याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागास संपर्क केला.
तक्रारीची पडताळणी करून एसीबीने आज भोकरदन येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सायंकाळी सापळा लावला. ५ वाजेच्या दरम्यान दुय्यम निरीक्षक संजय पवारने तडजोड करून १५ हजार रुपयांची लाच घेतली. याचवेळी एसीबीच्या पथकाने पवार यास रंगेहाथ पकडले. पोलिसांनी पवार यास ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारूती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, साईनाथ तोडकर, राजेंद्र सीनकर, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.