वादळाने नजर धूसर झाली; बाईकची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांची प्राणज्योत मालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 15:22 IST2021-04-20T15:22:03+5:302021-04-20T15:22:48+5:30
अचानक वादळ आल्याने दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटले

वादळाने नजर धूसर झाली; बाईकची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांची प्राणज्योत मालवली
भोकरदन : तालुक्यातील सोयगाव देवी फाटा ते गारखेडा या रस्त्यावर मंगळवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान दोन दुचाकी समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून ११ वर्षांची एक मुलगी गंभीर जखमी आहे. विशाल कैलास साबळे ( 20, रा बरंजळा ता. भोकरदन ) आणि विशाल शिवाजी दळवी ( 20, रा. येवता ता जाफराबाद ) अशी मृतांची नावे आहेत. तर वैष्णवी दगडुबा साबळे (११ ) ही गंभीर जखमी असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल कैलास साबळे आणि वैष्णवी दगडुबा साबळे हे दोघे गारखेडाहून बरंजळा गावाकडे दुचाकीवरुन जात होते. तर विशाल शिवाजी दळवी हा सोयगाव देवी फाट्याकडून औरंगाबादकडे बहिणीला आणण्यासाठी दुचाकीवरुन जात होता. सोयगाव देवी फाटा ते गारखेडा दरम्यान अचानक वादळ आल्याने दोघांचेही नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात विशाल साबळे आणि विशाल दळवी जागीच ठार झाले. तर वैष्णवी साबळे ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे यांनी ग्रामीण रुग्णालयात जखमी मुलीची भेट घेतली. तसेच भोकरदन पोलीस सुद्धा रुग्णालयात दाखल झाले आहेत.