७०० कोटींच्या विकास कामांना राज्य शासनाने दिली स्थगिती -संतोष दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:42 IST2020-02-23T00:42:09+5:302020-02-23T00:42:37+5:30
२५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिली.

७०० कोटींच्या विकास कामांना राज्य शासनाने दिली स्थगिती -संतोष दानवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकरी आत्महत्या, संपूर्ण कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार यासह इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून विविध योजनांना स्थगिती देण्याचा धडाका महाविकास आघाडी शासनाने लावला आहे. जालना जिल्ह्यातील तब्बल ७०० कोटी रूपयांच्या विकास कामांना या शासनाने स्थगिती दिली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला जागे करण्यासाठी भाजपाच्या वतीने मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिली.
पालकमंत्री सत्कार स्वीकारण्यात व्यस्त
सरकार स्थापन होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे सध्या केवळ सत्कार स्वीकारण्यातच व्यस्त दिसत आहेत. जिल्ह्याच्या नव्हे त्यांच्या मतदार संघाच्या विकास आराखड्याबाबतही त्यांनी नियोजन केल्याचे दिसत नाही. जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या म्हणता लोकप्रतिनिधींना आज सायंकाळी फोनद्वारे माहिती दिली जात आहे. असाच कारभार चालला तर विकास कामे कसे होतील, असा प्रश्न आ. दानवे यांनी उपस्थित केला.