SSC Exam: बदनापूरमध्ये परीक्षा केंद्रावर दगडफेक, पेपर फुटला नसल्याचा प्रशासनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:55 IST2025-02-21T14:45:02+5:302025-02-21T14:55:10+5:30
स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे.

SSC Exam: बदनापूरमध्ये परीक्षा केंद्रावर दगडफेक, पेपर फुटला नसल्याचा प्रशासनाचा दावा
जालना: बदनापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर आज पेपर फुटल्याचा दावा करण्यात येत आहे. शिक्षण विभागाकडून मात्र, या परीक्षा केंद्रावर पालक वर्गाकडून दगडफेक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. बदनापूर येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रामध्ये एकूण १४ हॉल असून ३२८ विद्यार्थी यांनी आज मराठी विषयाचा पेपर दिला हा पेपर सुरू झाल्यानंतर सुमारे तासाभरापूर्वी हा पेपर बाहेर आल्याचा दावा नागरिकांमधून होत आहे
आजपासून सुरू झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका केंद्रावर मराठी विषयाची प्रश्नपत्रिका अवघ्या पंधरा मिनिटांतच परीक्षा केंद्राबाहेर आली. त्यानंतर शहरातील झेरॉक्स सेंटरवर प्रश्नांची उत्तरे तयार करून त्याचे सेट करण्यात आले. हे सेट परीक्षा हॉलमधील विद्यार्थ्यांना चोरट्या मार्गाने पुरवण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र, प्रशासनाने असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले.
खातर जमा करण्यात येत आहे
याविषयी येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी. एन. क्षीरसागर म्हणाले की, या परीक्षा केंद्रावर पेपर फुटलेला नाही. एका हॉलमध्ये बाहेरील जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये खिडकीची काच फुटली आहे. तसेच काही पालकांनी हॉलमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जमाव पांगवला. या प्रकाराची शिक्षण विभागाकडून खातर जमा करण्यात येत आहे.
दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाही
आज काही वृत्त वाहिन्यानी ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला’ या आशयाचे चूकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसुन, स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषीं व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.
अहवाल मागितला आहे
संबंधित शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालक यांच्याकडून तत्काळ अहवाल मागविण्यात येत आहे. स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी तेथे उपस्थित आहेत. दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. वैशाली जामदार, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ