जालन्यात एसआरपीएफ जवानाने राहत्या घरात आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
पुरूषोत्तम खेडेकर (वय, २८) असे आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. खेडेकर यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी खेडेकर यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.