नोकरी देणारे झाले शेतकरीपुत्र; स्वबळावर उभारला सेंद्रिय गूळ उद्योग, विदेशात करणार निर्यात

By शिवाजी कदम | Published: February 7, 2024 07:10 PM2024-02-07T19:10:27+5:302024-02-07T19:11:06+5:30

जुने साहित्य खरेदी करून सुरू केला स्वतःचा गूळ उद्योग प्रकल्प

Sons of farmers became employers; Agricultural processing industry set up, will be exported abroad | नोकरी देणारे झाले शेतकरीपुत्र; स्वबळावर उभारला सेंद्रिय गूळ उद्योग, विदेशात करणार निर्यात

नोकरी देणारे झाले शेतकरीपुत्र; स्वबळावर उभारला सेंद्रिय गूळ उद्योग, विदेशात करणार निर्यात

- संतोष सारडा
बदनापूर :
तालुक्यातील सोमठाणा शिवारात दहा शेतकरी व पदवीधरांनी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसावर प्रक्रिया करून गूळ उद्योगाची उभारणी केली आहे. लवकरच हा गूळ निर्यात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या अनेक युवक शिक्षण घेऊन अनेक विविध प्रकारच्या पदव्या मिळवत आहेत. परंतु, या पदवीधरांना शासकीय नोकऱ्या मिळत नसल्यामुळे अनेक पदवीधर बेरोजगार आहेत. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील पदवीधरांनी एकत्र येऊन गूळ निर्मितीचा व्यवसाय सुरू करून उत्पादित केलेला गूळ जागेवरच यशस्वीपणे विक्री करून बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

तालुक्यातील सोमठाणा येथील सचिन धायवर, विशाल नागवे, योगेश नागवे, नारायण मुटकुळे, भूषण कोल्हे, गजेंद्र गायके या शेतकरी कुटुंबातील युवकांनी एकत्र येऊन आपल्या कुटुंबात ३०-३५ वर्षांपूर्वी असलेल्या गूळ निर्मितीबाबत उद्योग उभारणीचा विचार केला. यानंतर सोमठाणा शिवारातील गट नंबर ४८९ मध्ये शेतकरी गूळ उद्योग समूह याउद्योगाची उभारणी केली. शेतकरी कुटुंबातील या युवकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील वर्षापासून या उद्योगाची सुरुवात केली आहे. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या या युवकांनी सुरुवातीला प्रत्येकी ५० हजार रुपये भाग भांडवल उभारून या व्यवसायाकरिता कोल्हापूर व अन्य परिसरात गूळ उद्योगाची पाहणी केली. त्यानंतर भाग भांडवल कमी असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून एका गूळ उद्योग कारखान्यातील गूळ निर्मिती करण्यासाठी लागणारे जुने साहित्य खरेदी केले. त्यामध्ये रस काढण्यासाठी मोठा चरक,१८ एचपीचे इंजिन, साचे असे साहित्य आणले.

सेंद्रिय गुळाची निर्मिती
ऊस तोडणीसाठी सहा कामगार असून या उद्योगात प्रतितास दीड टन क्रशिंग करून रस तयार केला जातो. हा गूळ संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केला जातो. यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल मिसळल्या जात नसल्याचे या उद्योगाचे चेअरमन बाबुराव नागवे यांनी सांगितले. मागील वर्षी येथे २०० टन उसाचे गाळप केले होते. यावर्षी ७०० टन ऊस गाळप करण्याचा प्रयत्न आहे. या उसाच्या रसावर प्रक्रिया करून दीड किलो एक किलो पाच किलो अशा वजनाच्या गुळाच्या भेल्या तयार केल्या जातात. डिगांबर नागवे हे ज्येष्ठ शेतकरी आपल्या गूळ बनविण्याच्या अनुभवावरून आज येथे गूळ बनवितात.

कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नाही
अडीच लाखांच्या भाग भांडवलावर गूळ निर्मिती सुरू केली आहे. आगामी काळात येथे यंत्रसामग्री वाढविण्यात येईल. उद्योग उभारणीसाठी कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नाही. या उद्योगांमध्ये विविध प्रकारचे पदवीधर आहेत. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. आमच्या उद्योगाला नुकतेच दुबई येथील काही लोकांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आम्ही उत्पादित केलेला गूळ निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहोत.
- विशाल नागवे, संचालक, समर्थ गूळ उद्योग.

Web Title: Sons of farmers became employers; Agricultural processing industry set up, will be exported abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.