Shri Gajanan Maharaj Palkhi welcomed in Shahagad, Ankushanagar, Vadigodri. | श्री गजानन महाराज पालखीचे शहागड, अंकुशनगर, वडीगोद्रीत उत्साहात स्वागत

श्री गजानन महाराज पालखीचे शहागड, अंकुशनगर, वडीगोद्रीत उत्साहात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : आषाढी एकादशीनंतर शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी शहागड येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
गुरूवारी सकाळी सात वाजता पालखी सालाबादप्रमाणे जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात थांबली होती. तेथे व्यापारी बांधवांच्या वतीने स्वागत, पूजा, आरतीनंतर पालखीत सहभागी वारकरी बांधवांसह पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी एक वाजता पालखी सोहळा शहागडहून येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरून शेगावकडे मार्गस्थ झाला. शहागड ते वडीगोद्री दरम्यान बारा किमीच्या अंतरात उड्डाणपुलाचे, सर्व्हिस रोडचे, चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने, तसेच बरेच ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत असल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर शहागड येथून तीन किलोमीटरपर्यंत पालखी बाहेर निघेपर्यंत सपोनि शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, गोपनीय शाखेचे पो.कॉ.महेश तोटे, प्रदीप आढाव, सहायक फौजदार अख्तर शेख, गणेश लक्कस, आहेर वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. पालखी मार्गस्थ होईपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अंकुशनगर येथे दर्शनासाठी गर्दी
अंकुशनगर महाकळा येथे दाखल झालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या मार्गावर असलेल्या पालखीसाठी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
शहापूर येथे मुक्काम
श्री संत गजानन महाराज पालखीचे जालना जिल्ह्यात वडीगोद्री व शहापूर येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. शहापूर येथे अल्पोपाहाराच्या कार्यक्रमानंतर कीर्तनाचा कार्यक्रम व श्री संत गजानन महाराज यांचा जीवन पट दाखविण्यात आला. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यानंतर शहापूर येथे मुक्काम करून पालखीचे शनिवारी अंबडकडे प्रस्थान होणार आहे.

Web Title: Shri Gajanan Maharaj Palkhi welcomed in Shahagad, Ankushanagar, Vadigodri.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.