जालन्यात कार्यरत पोलिसाची हत्या; देऊळगाव राजा येथे बंद कारमध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:26 IST2025-04-01T12:25:53+5:302025-04-01T12:26:11+5:30

जालना जिल्हा पोलिस दलात हाेते कार्यरत : तीन संशयित ताब्यात

Shocking! Policeman killed in Jalna; Body found in closed car | जालन्यात कार्यरत पोलिसाची हत्या; देऊळगाव राजा येथे बंद कारमध्ये आढळला मृतदेह

जालन्यात कार्यरत पोलिसाची हत्या; देऊळगाव राजा येथे बंद कारमध्ये आढळला मृतदेह

देऊळगाव राजा (जि.बुलढाणा)/जालना : जालना जिल्हा पोलिस दलाच्या महामार्ग विभागात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (वय ३८, रा.गिरोली खुर्द, ता.देऊळगाव राजा) यांची हत्या झाल्याची घटना ३० मार्चला उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, देऊळगाव राजा तालुक्यात सात दिवसांत पोलिसाच्या हत्येची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.

गुढीपाडवा सणानिमित्त शनिवारी म्हस्के त्यांच्या मूळ गावी आले होते. काही कामानिमित्त ते गिरोलीहून देऊळगाव राजाला गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना अनेकदा फोन केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मोबाइल लोकेशन ट्रेस केले. सिंदखेडराजा रोडवरील आर.जे. इंटरनॅशनल स्कूलजवळील वनविभागाच्या हद्दीत त्यांची कार उभी असल्याचे आढळले. पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, कार आतून लॉक होती आणि ड्रायव्हिंग सीटवर म्हस्के यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा असल्याने गळा आवळून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

फॉरेन्सिक तपास सुरू, तिघांना अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना तपासासाठी पाचारण करण्यात आले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

सात दिवसांत दुसरी हत्या
२३ मार्च रोजी अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाली होती. त्यानंतर, सात दिवसांतच पुन्हा एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे.

Web Title: Shocking! Policeman killed in Jalna; Body found in closed car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.