धक्कादायक! चटके दिलेल्या घटनेपूर्वी कैलास बोराडे मंदिरात मद्यपान करून फिरत होते अर्धनग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:39 IST2025-03-08T15:37:30+5:302025-03-08T15:39:57+5:30
या व्हिडीओमुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

धक्कादायक! चटके दिलेल्या घटनेपूर्वी कैलास बोराडे मंदिरात मद्यपान करून फिरत होते अर्धनग्न
भोकरदन (जि. जालना) : गरम रॉडने चटके दिल्याने गंभीर जखमी झालेल्या कैलास बोराडे यांचा घटनेपूर्वीचा एक व्हिडीओ ६ मार्च रोजी रात्री समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास बोराडे हे मद्यपान करून अर्धनग्न अवस्थेत महादेव मंदिराच्या आवारात फिरताना व्हिडीओत दिसत आहेत. या व्हिडीओमुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी २६ फेब्रुवारी रोजी रात्री कैलास बोराडे यांना लोखंडी रॉडने चटके देऊन गंभीर जखमी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर बोराडे यांच्या तक्रारीवरून नवनाथ दौड व भागवत दौड या भावंडांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र या घटनेच्या दिवशी नेमका काय प्रकार झाला व कशामुळे झाला याचे व्हिडीओ आता बाहेर येत आहेत.
असाच एक व्हिडीओ ६ मार्च रोजी रात्री व्हायरल झाला आहे. त्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान अनेक भाविक या मंदिरांवर दर्शनासाठी आलेले होते. त्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी कैलास बोराडे हे अर्धनग्न अवस्थेत मद्यपान करून मंदिरात जात होते त्यामुळे महिला शरमेने या ठिकाणाहून बाहेर जात होत्या. बोराडे यांना तू मंदिरात जाऊ नको, असे अनेकांनी सांगितले. मात्र, माझ्या अंगात महादेव संचारला आहे. तुम्ही मला कसे थांबवता. म्हणून त्याने ऐकले नाही व उपस्थितांशी वाद घातला. त्यामुळे उपस्थितांचा राग अनावर झाला होता व त्यातून कैलास बोराडे यांना गरम रॉडने चटके दिल्याचे चुकीचे कृत्य घडल्याचे परिसरातील नागरिक व्हायरल व्हिडीओनंतर बोलू लागले आहेत.
बोराडे, दौडकडूनही व्हिडीओ
बोराडे यांनी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर स्वतः एक व्हिडीओ तयार केला व आपण उबाठाचे तालुकाप्रमुख नवनाथ दौड यांचे नाव सांगितले नाही, ते त्यावेळी तेथे नव्हते. त्यांचा काही संबंध नाही असे सांगितले. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी हा प्रकार नवनाथ दौड यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. तर नवनाथ दौड यांनीसुद्धा प्रयागराज येथे परिवाराच्या सोबत दर्शनासाठी गेलेलो असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला व माझा काही संबंध नसताना राजकीय दबावापोटी पोलिसांनी मला या प्रकरणात गोवले असल्याचे सांगितले. तर त्यांची मुलगी प्रांजल दौड, पत्नी व लहान मुलगी यांनीसुद्धा आमच्या वडिलांचा प्रकरणाशी काही संबंध नाही. केवळ त्यांना राजकारणातून उठविण्यासाठी हे कटकारस्थान करण्यात आल्याचे सांगितले असून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व आम्हाला न्याय द्यावा, असे म्हटले आहे.
होय, तो व्हिडीओ माझाच - कैलास बोराडे
पेटत्या भट्टीतील लोखंडी सळईचे संपूर्ण अंगावर डागल्यामुळे गंभीररीत्या भाजलेल्या कैलास बोराडे (रा.अन्वी, ता.भोकरदन) यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्वी येथील महादेव मंदिरात विटंबना करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शुक्रवारी व्हायरल झाला. या व्हिडीओविषयी पत्रकारांनी कैलास यांना विचारले असता, ते म्हणाले की, होय, तो व्हिडीओ त्याचाच असल्याचे त्यांनी मान्य केले, शिवाय त्याच्या अंगात महादेव आहे. दारूचे व्यसन नाही, तर प्रसाद म्हणून त्या दिवशी दारू प्यायल्याचे त्यांनी सांगितले.
देव आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांची जेलमध्ये जागा
अन्वी (ता.भोकरदन) येथील महादेव मंदिरात एक जण विटंबना करीत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जरांगे म्हणाले की, हा व्हिडीओ मी पाहिला नाही, शिवाय त्याविषयी खात्रीने बोलता येणार नाही. मात्र, देवी, देवता असो किंवा आपल्या महापुरुषांची विटंबना करणाऱ्या अशा समाजकंटकाला तातडीने पकडून जेलमध्ये डांबायला हवे. हा व्हिडीओ त्या मोठ्या नेत्याला पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले.
दौडला पुन्हा पोलिस कोठडी
या प्रकरणातील आरोपी भागवत सुदाम दौड याची शुक्रवारी पोलिस कोठडी संपली होती. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.