धक्कादायक ! जालन्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा दिवसाढवळ्या खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 18:57 IST2021-05-13T18:56:32+5:302021-05-13T18:57:30+5:30
crime news in Jalana अज्ञात व्यक्तीने आरटीओ रोडवरील खदानीजवळ नेऊन लाकडाच्या दांड्याने मारहाण करून केला खून.

धक्कादायक ! जालन्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा दिवसाढवळ्या खून
चंदनझिरा ( जालना ) : एका ४२ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना जालना शहराजवळील आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खदानीजवळ गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मण रूपचंद उंबरे (४२, रा. साईमंदिर, सुंदरनगर जालना) असे मृताचे नाव आहे.
लक्ष्मण उंबरे हे एमआयडीसी येथे पत्र्याच्या शेडचे काम करतात. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आरटीओ रोडवरील खदानीजवळ नेऊन लाकडाच्या दांड्याने त्यांना मारहाण करून खून केला. खून झाल्याची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी डॉग स्काॅर्डला पाचारण करण्यात आले होते.
पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी व चपला जप्त केल्या आहेत. या प्रकरणी मृताचा मुलगा सागर लक्ष्मण उंबरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी भेट दिली. आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.