रेशीम कोष निर्मितीतून वर्षात घेतले सात लाखांचे उत्पन्न; अत्यल्प पाण्याचे नियोजन ठरले फायद्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:29 IST2018-05-26T13:29:32+5:302018-05-26T13:29:32+5:30
जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष कचरे यांनी रेशीम उद्योग शेतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात रेशीम कोष निर्मिती केली.

रेशीम कोष निर्मितीतून वर्षात घेतले सात लाखांचे उत्पन्न; अत्यल्प पाण्याचे नियोजन ठरले फायद्याचे
- विष्णू वाकडे
जालना : जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष कचरे यांनी रेशीम उद्योग शेतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात रेशीम कोष निर्मिती केली. यातून त्यांना एका वर्षात जवळपास सात लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
संतोष कचरे यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती आहे. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात रेशीम उदयोगाचे प्रशिक्षण घेऊन शेतात तुतीची लागवड केली. त्यांना याचा चांगलाच फायदा झाला असून, त्यांनी एकाच वर्षांत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. संतोष कचरे यांनी आक्टोबर २०१६ मध्ये २० बाय ५० चे शेड उभारून अडीच एकर तुतीची लागवड केली. शेतातील विहिरीत जेमतेम पाणी असल्याने त्यांनी ठिबक सिंचन केले. यामुळे तुतीला कमी प्रमाणात पाणी लागले.
कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी तुतीला खते, औषधी वापरली. त्यामुळे मालही चांगला आला. त्यानंतर जुलै २०१७ मध्ये पहिले पीक काढण्यात आले. आणि यापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. त्यांनी २०१७-१८ मध्ये सातत्याने रेशीम कोष उत्पादनासाठी अकरा पिके घेतली. प्रत्येक टप्प्यातून त्यांना सरासरी पावणे दोन क्विंटलपर्यंत रेशीम कोष मिळाले. त्यानंतर त्यांनी बंगळूर येथील रामनगरमध्ये वर्षभरात अकरा वेळा कोष विक्री केली. यामधून त्यांना ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रत्येक टप्प्यासाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. यातून त्यांनी सात लाखांचा निव्वळ नफा मिळविला. त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अजय मिटकरी व जगदीश प्रसाद भूतडा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
रेशीम कोष व्यवसायात २९ दिवस परीश्रम घ्यावे लागतात. यावेळी आपण फक्त अळी संगोपनावर लक्ष दिले. शेडसाठी आपणास अनुदानही मिळाले नाही. तरीही योग्य पध्दतीने खर्च करून रेशी शेती साकारली असल्याचे शेतकरी सतोष कचरे यांनी सांगितले.
योग्य व्यवस्थापन करून रेशीम कोष निर्मिती व्यवसायात येणाऱ्या शेतकऱ्यांनी तुतीच्या कडीची लागवडी करण्याऐवजी रोपे लावून तुती वाढविली. यामध्ये तुतीचा पाला महत्तवाचा असतो, असे कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अजय मिटकरी यांनी संगितले.