सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 10:38 IST2025-12-28T10:37:09+5:302025-12-28T10:38:04+5:30
विवाह सोहळ्यात रंगली नेत्यांची टोमणेबाजी...!

सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
फकिरा देशमुख -
भोकरदन (जि. जालना) : एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार हे करमाड (लाडगाव) येथील एका विवाह सोहळ्यात शनिवारी एकत्र आले होते. दानवे यांनी आज पहिल्यांदाच चांगले काम केले, असे म्हणत सत्तार यांनी डिवचल्यानंतर सत्तार यांनी एकही चांगले काम केल्याचे आठवत नाही, असे म्हणत दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांच्या टोमणेबाजीने वऱ्हाडी मंडळींचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.
लाडगाव येथील आदिती लॉन्स येथे शासकीय कंत्राटदाराच्या मुलाचा साखरपुडा होता. या कार्यक्रमासाठी गर्दी झाल्याने दानवे यांनी वधू-वरांच्या पालकांना साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह उरकून घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला दोन्हीकडील वऱ्हाडी मंडळींनी प्रतिसाद दिला व साखरपुड्याचे रूपांतर विवाह सोहळ्यात झाले.
दोघा नेत्यांमधून विस्तव जात नसला तरी त्यांच्याच पुढाकाराने साखरपुड्यातच अक्षता पडल्याने वऱ्हाडी मंडळी कौतुक करीत होती.
वऱ्हाडी लागले हसायला - अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, रावसाहेब दानवे यांनी आज पहिल्यांदा चांगले काम केले व आज हा विवाहाचा योग्य घडून आणला. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यावर रावसाहेब दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी माझे चांगले काम केल्याबद्दल अभिनंदन केले, त्यांचे मी आभार मानतो. मी एक तरी चांगले काम केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अब्दुल सत्तार यांनी आतापर्यंत एकही चांगले काम केल्याचे मला आठवत नाही. यावर वऱ्हाडी मंडळींत हशा पिकला नसता तरच नवल.