वाळू माफियांची मुजोरी, बदनापूरमध्ये नायब तहसीलदारांना मारहाण करून ट्रॅक्टर पळवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:02 IST2025-03-11T12:01:55+5:302025-03-11T12:02:18+5:30
घोटण गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला

वाळू माफियांची मुजोरी, बदनापूरमध्ये नायब तहसीलदारांना मारहाण करून ट्रॅक्टर पळवला
बदनापूर ( जालना): तालुक्यातील घोटण गावात बदनापूरचे नायब तहसीलदार हेमंत तायडे यांना मारहाण करून महसूल पथकाने पकडलेले ट्रॅक्टर वाळू माफियांनी पळवल्याची घटना आज पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत नायब तहसीलदार हेमंत तायडे म्हणाले की, काकासाहेब जाधव, योगेश वनारसे व अन्य एक कर्मचाऱ्यांचे महसूल पथक आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास घोटण शिवारातील दुधना नदी पात्रात आले होते. त्यावेळी नदीपात्रात एक वाळूने भरलेले ट्रॅक्टर आढळून आले. पथकाने थांबण्यास सांगितले असता चालक ट्रॅक्टर घेऊन तेथून भरधाव वेगात निघाला. नायब तहसीलदार हेमंत तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. घोटण गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे ट्रॅक्टर अडविण्यात आले. मात्र, ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला. दरम्यान, नायब तहसीलदार हेमंत तायडे हे पथकासह ट्रॅक्टरजवळ उभे असताना दहा ते पंधरा जणांचा जमाव तेथे आला. त्यांनी नायब तहसीलदार तायडे आणि महसूल पथकावर हल्ला केला. नायब तहसीलदार तायडे मारहाण करत वाळू माफियांनी ट्रॅक्टर पळून नेले.
दरम्यान, याबाबत बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी दिली आहे.