'समृद्धी'वर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारणीसाठी ‘ब्लॉक’; वाहनधारकांना १७ प्रकारचे दंड शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:35 IST2026-02-18T13:30:34+5:302026-02-18T13:35:02+5:30
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर मंगळवारी दुपारी ब्लॉक घेतल्याने शेकडो वाहने थांबली होती.

'समृद्धी'वर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारणीसाठी ‘ब्लॉक’; वाहनधारकांना १७ प्रकारचे दंड शक्य
जालना : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीअंतर्गत गॅन्ट्री उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. जालन्यातील चॅनल क्रमांक ३५० वर मंगळवारी (दि. १७) दुपारी १ वाजता आणि दुपारी ३ वाजता प्रत्येकी २० मिनिटांचा ‘ब्लॉक’ घेऊन काम करण्यात आले. या ‘ब्लॉक’मुळे महामार्गावर अनेक वाहने थांबली होती.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. या महामार्गावर वाहनांना वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे; परंतु वेगमर्यादेसह इतर वाहतूक नियम मोडून वाहने चालविले जात आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. हे अपघात रोखण्यासह चालकांना वाहतूक नियमांची शिस्त लागावी, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
याअंतर्गत जालना जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या चॅनल क्रमांक ३५० वर मंगळवारी दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान गॅन्ट्री उभारणीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या बाजूने ‘ब्लॉक’ टाकण्यात आला होता. २० मिनिटे संपूर्ण वाहतूक थांबविण्यात आली होती. यंत्रणा क्रेनच्या साहाय्याने उभी केल्यानंतर एका लेनद्वारे वाहतूक पूर्ववत करण्यात आली, तर याच चॅनल क्रमांकावर दुपारी ३ ते ४ दरम्यान ‘ब्लॉक’ घेण्यात आला होता. इथेही २० मिनिटे संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली. नंतर एका लेनद्वारे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला नाही. यावेळी महामार्ग विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर चौधरी यांच्यासह फाैजदार अशोक काळे, फाैजदार शंकर टाकरस, पाेलिस हेडकॉन्स्टेबल रवी बिरकायलू, गजानन काकड, स्वागत जगधने, प्रवीण बेडेकर, ज्ञानेश्वर केदार, कृष्णा खरात, रामनाथ काळे, लहू जाधव यांच्यासह महामार्ग विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
१७ प्रकारचे दंड होणार
नागपूर - समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर तब्बल १७ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर दंड होणार आहे. ओव्हरलोड, भरधाव वेगातील वाहने, सीटबेल्ट नसणे यासह इतर नियमांचा यात समावेश आहे. त्यामुळे आता चालकांना सर्व नियमांचे पालन करून वाहने चालवावी लागणार आहेत.