'शेतकऱ्यास फाशीचा दोर, तर राजकारणी चोर'; चिमुकल्या 'भोऱ्या'ने मांडली मराठवाड्याची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:18 IST2025-09-17T14:14:45+5:302025-09-17T14:18:14+5:30
माझ्या मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, माणुसकीचा लळा, आपुलकीचा जिव्हाळा; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भोऱ्या उर्फ कार्तिक वजीरचे शाळेतील भाषण व्हायरल

'शेतकऱ्यास फाशीचा दोर, तर राजकारणी चोर'; चिमुकल्या 'भोऱ्या'ने मांडली मराठवाड्याची व्यथा
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एकीकडे शासकीय कार्यक्रमात राजकीय नेते भाषणातून विकासकामांचे दावे करत असताना, दुसरीकडे अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील चौथीत शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून मराठवाड्याची खरी व्यथा मांडली आहे. 'भोऱ्या' उर्फ कार्तिक वजीर याने दिलेल्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
भाषणात काय म्हणाला 'भोऱ्या'?
राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमात आपल्या प्रभावी भाषणासाठी ओळखला जाणारा कार्तिक, म्हणजेच ‘भोऱ्या’ने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत भाषण केले. त्याने आपल्या भाषणात मुंबईतील एका मित्राशी संवाद साधत मराठवाड्याची ओळख करून दिली.
भाषणात तो म्हणाला, “माझ्या मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, माणुसकीचा लळा, आपुलकीचा जिव्हाळा, दगडाच्या खाणी, प्रसिद्ध अजिंठा-वेरूळची लेणी, नऊवारी पैठणी आणि नाथसागराचे निर्मळ पाणी आहे. आद्य कवी मुकुंदराजांचे कुळ, छत्रपती शिवरायांचे मूळ, संत नामदेव-एकनाथांची वाणी, तीर्थयात्रेच्या स्थानी, तीन ज्योतिर्लिंगांना गोदाकाठीचे पाणी.”
माझ्या मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, माणुसकीचा लळा, आपुलकीचा जिव्हाळा; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भोऱ्या उर्फ कार्तिक वजीरचे शाळेतील भाषण व्हायरल #jalana#marathwadamuktisangramdin#marathwadapic.twitter.com/nsGEzC8VNN
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 17, 2025
'निजामानी लुटले, राजकारण्यांनी ओरबाडले'
केवळ मराठवाड्याची महतीच नाही, तर त्याने इथल्या शेतकऱ्यांची विदारक परिस्थितीही परखडपणे मांडली. त्याने अत्यंत कठोर शब्दांत म्हटले की, "शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा दोर, राजकारणी येथे सगळेच चोर." पुढे तो म्हणाला, "निजामानी लुटले, राजकारण्यांनी ओरबाडले."
या चिमुकल्या विद्यार्थ्याने आपल्या निरागस आणि प्रभावी शैलीत मराठवाड्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख सांगतानाच, इथल्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची व्यथाही मांडली आहे. त्याच्या या भाषणाने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले असून, त्याचे विचार ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. हे भाषण आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे.