तीर्थपुरीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; पती-पत्नीला मारहाण करून ३५ तोळे सोने लंपास

By दिपक ढोले  | Updated: November 18, 2022 11:44 IST2022-11-18T11:43:59+5:302022-11-18T11:44:21+5:30

कपाटाचे कुलूप तोडून जवळपास १७ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर फरार झाले.

Robbery rampage in Teerthpuri of Jalana dist; Husband and wife were beaten and looted of 35 tolas of gold | तीर्थपुरीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; पती-पत्नीला मारहाण करून ३५ तोळे सोने लंपास

तीर्थपुरीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; पती-पत्नीला मारहाण करून ३५ तोळे सोने लंपास

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून, पती-पत्नीला मारहाण करून १० ते १५ दरोडेखोरांनी १७ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे ३५ तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.    

तीर्थपुरी येथील उल्हास एकनाथ पवार व सुरेश एकनाथ पवार हे गावाजवळील शेतात राहतात. गुरूवारी मध्यरात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास १० ते १५ दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.  दरोडेखोरांनी सुरूवातीला उल्हास पवार यांच्या रूमला बाहेरून कडी लावली. त्याचवेळी उल्हास पवार यांना जाग आली. त्यांनी सुरेश पवार यांना आवाज देऊन चोर आल्याचे सांगितले. त्याचवेळी सुरेश पवार यांनी दरवाजा उघडताच, दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली.

कपाटाचे कुलूप तोडून जवळपास १७ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर फरार झाले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच,  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोनि. सुभाष भुजंग, पोनि. प्रशांत महाजन यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

Web Title: Robbery rampage in Teerthpuri of Jalana dist; Husband and wife were beaten and looted of 35 tolas of gold