धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे समाजाचा रास्ता रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:57 IST2025-10-01T15:56:54+5:302025-10-01T15:57:08+5:30
धनगर समाजाला हलक्यात घेतले, तर महाराष्ट्रात तांडव निर्माण करू; धनगर समाजाचा सरकारला इशारा

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे समाजाचा रास्ता रोको आंदोलन
पवन पवार, वडीगोद्री- धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा आणि तात्काळ प्रमाणपत्राची वाटप करावी, या मागणीसाठी दीपक बोराडे गेल्या पंधरा दिवसापासून जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. दीपक बोराडे यांना समर्थन देण्यासाठी बुधवारी राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हा आमचा लढा ७० वर्ष जुना आहे, तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देता आमचे मत घेता सत्ता भोगता आणि पुन्हा धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम हे सरकार करत आहे. जर धनगर समाजाला हलक्यात घेतले तर महाराष्ट्रात तांडव निर्माण करेल असा इशारा धनगर समाज बांधवांच्या वतीने सरकारला देण्यात आला.
आंदोलक दिपक बोऱ्हाडे गेली 15 दिवसापासून जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत. एस टी आरक्षण देऊन त्याचे उपोषण तात्काळ सोडवावे, अन्यथा दिपक बो-हाडे यांचा आदेशानुसार धनगरी बाणाने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जातील, चक्काजाम करतील, असा इशारा दिला देण्यात आला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वडीगोद्री येथे धनगर बांधवांनी चक्काजाम आंदोलन केले आहे. धनगर एस.टी आरक्षण अंबलबजावणी ' झालीच पाहिजे , येळकोट येळकोट ' जय मल्हार , धनगर एकजुटीचा ' विजय असो , या सरकारचे करायचे काय, खाली मुंडक वर पाय' अशा घोषणा देण्यात आल्या आणि सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी धनगर समाजाच्या वतीने महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन रास्ता रोको थांबवण्यात आला. या रास्ता रोको दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूने दुतर्फा रांगा लागल्या होत्या एक तास वाहतूक ठप्प झाली होती.