माजलगावहून नागपूरच्या काळ्या बाजारात जाणारा रेशनचा १० लाखांचा तांदूळ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:30 IST2025-02-03T16:28:53+5:302025-02-03T16:30:27+5:30
परतूर पोलिसांची कारवाई; ट्रकचा चालक, क्लिनर, मालकासह रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल

माजलगावहून नागपूरच्या काळ्या बाजारात जाणारा रेशनचा १० लाखांचा तांदूळ जप्त
परतूर : माजलगाव येथून नागपूर येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा १० लाख रुपयांचा तांदूळ परतूर पोलिसांनी वाटूर फाटा येथे जप्त केला. पोलिसांनी वाटूर फाटा येथे नाकाबंदी करून ट्रक (एमएच २३ एयू ९३९३) थांबवला. ट्रकची पाहणी केली असता, त्यामध्ये तांदूळ आढळला.
पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार दादामिया शेख यांना समक्ष घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर केला आहे. ट्रकमध्ये ३० टन रेशनचा सुमारे दहा लाख रुपयाचा तांदूळ व ३० लाखांचा ट्रक असा ४० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी ट्रकचालक राजेंद्र बळीराम पोटेकर (रा. सिपगाव, ता. गेवराई) आणि क्लिनर अमोल रावसाहेब उबाळे (रा. वरखेड, ता. शेवगाव) तसेच ट्रक मालक आणि रेशन दुकानदार अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुद्देमाल परतूर येथील शासकीय गोडावूनमध्ये जमा करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे, नायब तहसीलदार दादामिया शेख, उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, राऊते, नंदू खंदारे, किरण चव्हाण, नरेंद्र चव्हाण, भगवान खालापुरे, धोत्रे यांनी केली.