Revenue Day Special: Jalana district leads in Satbara digitization in the state | महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर

महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर

ठळक मुद्देगेल्या दहा वर्षांपासून सुरू होते विशेष प्रयत्न

जालना : पेपरलेस कार्यालय करण्यासाठी महसूल विभागाने जमावबंदी खात्याच्या माध्यमातून उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा उताऱ्यांचे डिजिटायजेशन करण्यासह आॅनलाईन फेरफार करणे या उपक्रमात जालना जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. 

महसूल विभागाकडून शेतजमिनी आणि नामांतर तसेच मृत्यूमुखी पडल्यानंतर वारसाचा फेर घेणे आदी कामांमध्ये मोठा वेळ खर्ची होत होता. त्याचप्रमाणे जमिनीची खरेदी-विक्री झाल्यानंतर संबंधित खरेदी-विक्रीदारांच्या हिश्यांची नोंद घेतानाही अनेक अडचणी येत होत्या; परंतु आता या अडचणी जिल्ह्यात दूर झाल्या आहेत. फेर घेणे आणि सातबारा उतारा मागण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या घरी अथवा कार्यालयामध्ये येण्याची गरज उरलेली नाही.  जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत.

गत काही वर्षात शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता सेतू सुविधा केंद्र आणि अन्य आॅनलाईन सुविधेच्या माध्यमातून ९ लाख १८ हजार २१० सातबाराच्या प्रती काढल्याची नोंद आहे. या सातबारा संगणकीकरणामुळे शेतकऱ्यांमधील होणारा वाददेखील कमी झाला आहे. फेर घेण्यासाठी जो कालावधी जात होता तोदेखील वाचला आहे. जवळपास २ लाख ४३ हजार ८२४ जणांचे आॅनलाईन फेरफार झाले असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. हे संगणीकरण करण्यासाठी एनआयसी विभागाची मोठी मदत झाल्याचे सांगण्यात आले. 


अन्य माध्यमातून ऑनलाईन सेवा देणार
महसूल विभागाने एकूणच संपूर्ण राज्यात पेपरलेस कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना कमीत कमी शासकीय कार्यालयात येण्याची गरज पडेल, अशी पावले उचलली जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील सेतू सुविधा केंद्र, तसेच अन्य माध्यमांतून ऑनलाईन सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नियमितपणे प्रशिक्षण देणे सुरू आहे, असे जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Revenue Day Special: Jalana district leads in Satbara digitization in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.